कोल्हापूर : कचऱ्याचे विलगीकरण करताना पोकलॅनच्या बकेटचा दात मानेत घुसून स्क्रॅप शोधणाऱ्या महिलेचे शिर धडावेगळे झाल्याची दुदैवी घटना रविवारी सकाळी कसबा बावडा येथील झुम प्रकल्पावर घडली. या घटनेमुळे प्रकल्पावर खळबळ माजली. घटनास्थळी महिलेचे धड मिळाले, पण शिर तुटून बकेटमधून कचऱ्याबरोबर ढिगाऱ्यात गायब झाल्याने सुमारे तीन तासाच्या अथक शोधकामानंतर ते कचर्यातच सापडले. मंगल राजेंद्र दावणे (वय ६० रा. तिरंगा चौक, आठ नंबर शाळेनजीक, शिवाजी पेठ, कोल्हापूर) असे त्या ठार झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. पोलिसांनी पोकलॅनवरील दोघा चालकांना ताब्यात घेतले आहे.घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, कसबा बावडा येथील झुम कचरा प्रकल्पावर संपूर्ण शहरातील कचरा टाकला जातो. रविवारी सकाळी इतर महिला मोठ्या ढिगाऱ्यानजीक कचऱ्यात स्क्रॅप शोधत होत्या, त्याचवेळी डंपीग ग्राऊंडच्या ठिकाणी पोकल्यानद्वारे कचरा हालवताना कचऱ्याच्या ढिगांमागे खड्ड्यात मंगल दावणे ह्या स्क्रॅप शोधत होत्या. पोकलॅन चालकाला ढिगाऱ्यामागे काही न दिसल्याने त्याने नेहमीप्रमाणे कचरा उचलला, त्याचवेळी बकेटचे दात स्क्रॅप शोधणाऱ्या त्या महिलेच्या मानेत घुसून त्याचे शिर धडावेगळे झाले.
धड कचऱ्याच्या खड्ड्यात राहीले तर शिर कचऱ्यासह उचलून इतर ढिगाऱ्यात टाकले. काहीवेळाने हा प्रकार चालकाच्या लक्षात आला. यावेळी त्याला कचऱ्याच्या खड्यात महिलेचे फक्त धडच दिसले. त्यानंतर तीन तास कचऱ्यात शोधकाम केल्यानंतर गडप झालेले शिर सापडले.