कोल्हापूर : तब्बल तीन महिन्यानंतर सलून सुरू झाल्याने नाभिक समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे कोल्हापुरातील एका सलून चालकाने सलून सुरू झालं म्हणून दुकानात आलेल्या पहिल्या ग्राहकाचे सोन्याच्या कात्रीने केस कापले आहेत. त्यामुळे पंचक्रोशीत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अटी आणि शर्तींवर आजपासून राज्यात सलून सुरू झाले आहेत. सलूनमध्ये फक्त कटिंग आणि हेअर डाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तीन महिन्यानंतर सलून सुरू झाल्याने नाभिक समाजामध्ये आनंदाचं वातावरण आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सलून बंद होते. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.
सलून सुरू होण्यासाठी अनेक सलून चालकांनी देव पाण्यात घातले होते. उत्पन्नाचं कोणतंच साधन नसल्याने या सलून चालकांनी आंदोलनही केलं होतं. कोल्हापुरातील रामभाऊ संकपाळ या सलून चालकाने तर सलून सुरू झाल्यास सोन्याच्या कात्रीने ग्राहकाचे केस कापण्याचा निश्चय केला होता. आज सलून सुरू होताच त्यांनी आपला हा निश्चय पूर्ण केला. सलून सुरू करताच त्यांच्या 'मिरर सलून'मध्ये आलेल्या ग्राहकांचे चक्क सोन्याच्या कात्रीने केस कापण्यासही सुरुवात केली. त्यामुळे या सलूनची पंचक्रोशीत जोरदार चर्चा सुरू होती.
गेल्या तीन ते सव्वा तीन महिन्यानंतर सलून सुरू झाले. हे तीन महिने आमची उपासमार सुरू होती. आज सलून सुरू झाले. हा पहिलाच दिवस आमच्यासाठी सोन्याचा दिवस आहे. त्यामुळे मी निश्चय केल्याप्रमाणे पहिल्याच ग्राहकाचे केस सोन्याच्या कात्रीने कापले, असं रामभाऊ संकपाळ यांनी सांगितलं. तसेच गेल्या तीन महिन्यात आम्हाला प्रचंड नुकसान सोसावं लागलं. त्यामुळे नाभिक समाजासाठी ठोस आर्थिक मदत मिळाली पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे, असंही त्यांनी सांगितलं.