* रुग्णांच्या सांगली-मिरजेच्या फेऱ्या थांबणार
शुभम गायकवाड :
उदगाव : उदगाव परिसरातील रुग्णांची संख्या पाहताना आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या पाठपुराव्याने मार्चमध्ये ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले आहे. आधी येथे प्रादेशिक क्षय रुग्णालय आहे. आता प्रादेशिक मनोरुग्णालय उभारण्याची घोषणा यड्रावकर यांनी मुंबई येथील बैठकीनंतर केली. त्यामुळे उदगाव आता रुग्णालयांचे केंद्र बनणार आहे.
सांगली-कोल्हापूर महामार्ग असलेल्या उदगावमध्ये शशिकला क्षय रुग्णालय असून ते प्रादेशिक असल्याने त्याचा फायदा सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांना होतो. शिरोळ येथील ग्रामीण रुग्णालयावर पडणारा ताण पाहता उदगाव ग्रामीण रुग्णालयाची मागणी होती, ती आता पूर्ण होत आहे. त्यासाठी ३० कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. ते रुग्णालय सुरुवातीला ३० बेडचे,त्यानंतर १०० बेडचे करायचे असा मंत्री यड्रावकर यांचा मानस आहे. त्यासाठी उच्चस्तरीय समितीकडे ते प्रकरण कार्यान्वित आहे.
मुंबई येथे मंत्रालयातील बैठकीत उदगावला लवकरच प्रादेशिक मनोरुग्णालय करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. याचा उपयोग सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सिंधुदुर्गसाठी होणार आहे. त्यामुळे रुग्णांना आता सांगली-मिरजेच्या रुग्णालयांवर अवलंबून न राहता तालुक्यातच उपचार मिळणार असल्याने तालुक्यातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
--------
चौकट -
तिन्ही शासकीय रुग्णालये एकाच ठिकाणी
उदगाव येथे शशिकला आरोग्य धामची ४२ एकर इतकी जागा आहे. त्यावर आता क्षयरोग रुग्णालय अस्तित्वात आहे. तिथेच ग्रामीण रुग्णालय मंजूर आहे. आता मनोरुग्णालयही त्याच जागेवर होत असल्याने एकाच ठिकाणी सर्व उपचार मिळणार आहेत.