कोल्हापूर : रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज सहन झाला नसल्याने जमावाने हॉस्पिटलची तोडफोड केल्याची घटना सोमवारी रात्री ११ च्यासुमारास घडली. डॉक्टरांसह कर्मचाय्रांनाही बेदम मारहाण करण्यात आली. भक्तीपूजानगर परिसरातील लाईफ लाईन रुग्णालयामध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा नोंद झाला.जुना राजवाडा पोलिसांने सांगितले, डॉ. संदीप पांडूरंग इंचनाळकर (वय ४२. रा. लाईफ स्टाईल अपार्टमेंट, प्रतिभानगर) यांचे भक्तीपुजानगर येथे लाईफ लाईन रुग्णालय आहे. रुग्णालयाच्या समोरच सदानंद सुळेकर यांची फोर्स जिम अँड फिटनेस सेंटर आहे.
सोमवारी रात्री अकराच्या सुमारास रुग्णवाहिकेतून लाईफ लाईन रुग्णालयामध्ये गंभीर रुग्णाला आणले. रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवजाचा राग धरुन संशयित सदानंद सुळेकर यांनी त्यांची दोन मुले, त्याच्या बरोबरच चार ते पाच अनोळखी लोक असा जमाव लोखंडी पाईप घेवूनच रुग्णालयाच्या दिशेने आले.
रुग्णालयातील टेबलवरील काच, फॉनची तोडफोड केली. येथील सुरक्षा रक्षक, डॉक्टर, वॉर्डबॉयसह कर्मचाय्रांना लोखंडी पाईपने तसेच लाथाबुक्कयांनी मारहाण केली. या प्रकरणी संशयित सदानंद सुळेकर व त्यांची दोन मुले आणि अनोळखी चार ते पाच अशा आठ जणांविरोधात महाराष्ट्र वैद्यकिय सेवा व्यक्ती आणि वैद्यकिय सेवा संस्था अधिनियम २०१० चे कलम ४ प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.