प्रदीप शिंदे
कोल्हापूर : सोमवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. संध्याकाळी पावसानं चांगलाच जोर धरला होता. कोल्हापूरातून आता निघण्याच्या तयारीत असताना आजूबाजूच्या प्रवाशांची कुजबूज कानावर आली. पावसामुळे महामार्ग बंद झालेत आणि काळाजत धस्स झाले. या परक्या शहरात रहायचे कसे खायचे काय? असा प्रश्न परजिल्हयातील चालक वाहकांना पडला असताना, कोल्हापूर आगारातील अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक संस्था आमच्यासाठी देवदूतासारखे धावून आल्याची भावना मध्यवर्ती बसस्थानकांत अडकलेल्या दिडशे चालक वाहकांनी व्यक्त केली.
पावसाचा जोर वाढल्याने कोल्हापूर विभागाच्यावतीने एस.टी.ची सर्व वाहतूक बंद करण्यात आली. कर्नाटक राज्यातील बेळगाव, विजापूर डेपोसह कोकण, सोलापूर, पुणे, मुंबई, सांगली,सातारा येथील सुमारे 150 चालक वाहक मध्यवर्ती बसस्थानकांत गेली पाच दिवसापासून अडकून पडले. नियमानुसार या चालक वाहकांना गाडी सोडून जाता येत नसल्याने त्यांना तिथेच थांबून होते.विजापूर गाडीचे वाहक समीर टांगेवाले म्हणाले , सोमवारी गाडीत बसलो पावसांची रिपरिप सुरू होती. बाहेरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बाहेर पडलो. पावसामुळे वाहतूक बंद होती आम्ही खाली उतरलो आणि आढावा घेत होतो. घड्याळाचे काटे पुढे पुढे सरकू लागले, तशी आमची चलबिचल वाढली. पाहता पाहता घड्याळाचा काटा रात्रीचा एकचा आकडा ओलांडून गेलादेखील. जवळपास जाणाऱ्या प्रवाशांनी आपापली सोय पाहून काढता पाय घेतला. एस.टी.मध्ये मोजकेच राहिलो होतो. प्रत्येकांच्या चेहऱ्यावर काळजी दिसू लागली. पावसानंही जोर धरला. वातावरण आता भेसूर होऊ लागलं होतं. एव्हाना अन्य गाडीतील वाहक-चालक आले होते. ती रात्र तिथंच काढावी लागेल, अशी चिन्ह दिसत होती. आता आमच्या पोटात गोळा आला होता. आम्ही गाडीत बसून कशीतरी रात्र काढली. सकाळ झाली तरी पावसाने उघडीप दिली नव्हती. पाऊस काही कमी होत नव्हता. दुपारीपर्यंत बसस्थानकांत बसून होतो. एकच गोंधळ उडाला. तिकडे जाऊन पाहतो, तर कोल्हापूरातील आगार व्यवस्थापक अजय पाटील आणि त्यांचे कर्मचारी चक्क जेवण घेऊन आले होते. हे पाहून डोळ्यात पाणी आले. कोल्हापूरातील लोकांची माणुसकी पाहून मनाला समाधान वाटले, असे वाहक-चालकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
कोल्हापूर आगारांच्यावतीने परगावच्या सर्व चालक वाहकांसाठी राहण्याची सोय तसेच जेवणासह चहा नाष्ट्याची सोय करण्यात आली आहे. कोल्हापुरातील अनेक तरूणांनी, मंडळांनी स्वयंसेवी संस्थांनी उत्स्फूर्तपणे मदतीचा हात दिला आहे. गेल्या पाच दिवसांपासून शहराच्या विविध भागात हे मदतकार्य सुरू आहे, अशी मदत कुठे मिळत नाही अशी बोलकी प्रतिक्रिया येथील चालक वाहकांच्यावतीने व्यक्ती करण्यात आली. पूरामुळे सर्व मार्गावरील वाहतूक बंद आहे. त्यामुळे कोल्हापूर आगारात सुमारे 150 चालक वाहक अडकलेत. कोल्हापूर आगार व सामाजिक संस्थेच्यावतीने या सर्वाची राहण्याची, नाष्टांच्याची व जेवणाची सोय केली आहे.दयानंद पाटील, ज्युनिअर आगार व्यवस्थापक
गेले सहा दिवस आम्ही याठिकाणी पावसामुळे थांबलो आहे. मात्र याठिकाणी आम्हाला कोणतीही अडचण जाणवली नाही. दोन वेळ जेवण, नाष्टा आणि चहा तसेच राहण्याची सोय केली. कोल्हापूरकरांचा अनोखा पाहुणचार पाहून आम्ही भारावलो आहे.शशिकांत बनसोडे, चालक मालवण डेपो