कोल्हापूर : कोल्हापूर शहर व जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांवरील ५ हजार ७०० रुग्णांना लावलेले जादाचे १ कोटी ८१ लाख ४२ हजार ६९२ इतकी रक्कम लेखापरीक्षणामुळे कमी झाली आहे. यात महापालिका हद्दीतील ६६ व ग्रामीण भागातील २० रुग्णालयांचा समावेश आहे.
गेल्यावर्षी खासगी रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या जादा बिलाच्या तक्रारींमुळे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी महापालिका हद्दीतील रुग्णालये व ग्रामीण भागातील रुग्णालयांसाठी स्वतंत्र लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रत्येक लेखापरीक्षकाकडे काही रुग्णालयांची जबाबदारी सोपवण्यात आली. रुग्णाचे डिस्चार्ज होण्यापूर्वी रुग्णालयाने केलेले बिल लेखापरीक्षकांकडे जाते, ते या बिलाची तपासणी करतात, जादा बिल आकारले असेल तर ते कमी करून देतात व तेवढीच रक्कम रुग्ण किंवा नातेवाईकांकडून भरली जाते.
---
कोल्हापूर शहर
रुग्णालये : ६६
लेखापरीक्षक : २७
तपासणी झालेली बिले : ५ हजार २३३
आकारण्यात आलेले बिल : ३९ कोटी, ८८ लाख ९ हजार ९४६
लेखापरीक्षणानंतर झालेले बिल : ३८ कोटी १७ लाख ५६ हजार ३४८
कमी झालेले बिल : १ कोटी ७१ लाख ४२ हजार ६९२
---
कोल्हापूर ग्रामीण
रुग्णालये : २०
लेखापरीक्षक १७
तपासणी झालेली बिले : ४६७
लेखापरीक्षणानंतर कमी झालेले बिल : १० लाख ६५ हजार
---
प्रांताधिकाऱ्यांची स्वतंत्र समिती
लेखापरीक्षकांनी बिलाची तपासणी केल्यानंतरदेखील रुग्णाच्या नातेवाईकांनी बिलाची रक्कम जास्त वाटत असेल किंवा त्यांचे समाधान झाले नसेल तर त्यांना तक्रार करता यावी यासाठी प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या स्वतंत्र समितीकडे ते तक्रार करू शकतात. ते या बिलांची पुन्हा शहनिशा करतात. जिल्ह्यात जयसिंगपूरमधील दोन रुग्णालयांबाबत अशा तक्रारी आल्या होत्या. मात्र शहर-जिल्ह्यातील एकाही रुग्णालयाला याबाबत नोटीस काढण्यात आलेली नाही.
---
गेल्या वर्षीपासून महापालिका हद्दीतील खासगी रुग्णालयांसाठी लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणाची तक्रार येवो न येवो रुग्णाचे डिस्चार्ज होण्यापूर्वी बिले शासकीय नियमानुसार आकारली आहेत का, हे लेखापरीक्षक तपासतात. त्यामुळे रुग्णांची फसवणूक थांबली आहे.
दीपक कुंभार (मुख्य लेखापरीक्षक)
--