कोल्हापूर : टाकाळा परिसरातील एका गणेशाच्या नावाने सुरू असलेल्या रुग्णालयात सासूसोबत आलेल्या विवाहितेची येथील महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या आरोग्य मित्राने छेड काढल्याने गोंधळ उडाला. संतप्त नातेवाइकांनी नराधम आरोग्य मित्रास समोर हजर करा, अन्यथा रुग्णालयाची तोडफोड करण्याचा इशारा दिला. बुधवारी सकाळी अचानक घडलेल्या प्रकाराने रुग्णालयाच्या प्रशासनाची धांदल उडाली.दरम्यान, संशयित आरोग्य मित्र पळून गेल्याने संतप्त नातेवाईक सीपीआर रुग्णालयामध्ये आले. येथील महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सुभाष नांगरे यांची त्यांनी भेट घेतली. घडलेल्या प्रकाराची माहिती देत ‘त्या’ आरोग्य मित्राला आमच्यासमोर हजर करा, अन्यथा टाकाळा येथील रुग्णालय फोडणार, अशी त्यांनी धमकी दिली. संबंधित आरोग्य मित्र हा मंगळवार पेठेत राहत असल्याने काही नातेवाईक त्याच्या घरी गेले; परंतु तो सापडला नाही. त्याने भीतीने मोबाईल बंद ठेवला होता.दौलतनगर येथे राहणाऱ्या पीडित विवाहितेचा दोन महिन्यांपूर्वीच विवाह झाला आहे. ती सासूला घेऊन जवळच्या खासगी रुग्णालयात गेली होती. तिथे महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या आरोग्य मित्राने त्यांना स्वत:हून बोलावून घेतले. विवाहितेकडे मोबाईल नंबर देण्याची मागणी केली.
तिने देण्यास नकार दिला असता तो समोरची कामे सोडून तिच्याकडे नंबर देण्यासाठी जबरदस्ती करू लागला. तेथून उपचार न घेताच विवाहिता सासूला घेऊन घरी आली. तिने पतीसह नातेवाइकांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
दौलतनगर येथील ५० पेक्षा जास्त लोकांचा जमाव थेट रुग्णालयात घुसला. छेड काढणारा आरोग्य मित्र पळून गेल्याने जमावाने गोंधळ घातला. या प्रकाराची माहिती समजताच काही आजी-माजी नगरसेवक रुग्णालयात आले. त्यांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला असता जमावाने त्यांचे ऐकले नाही.रुग्णालयातील व्यवस्थापक संबंधित आरोग्य मित्राला हजर करतो असे सांगून नातेवाइकांना सीपीआर रुग्णालयात घेऊन आला. येथील जीवनदायी योजनेच्या कार्यालयात चौकशी केली असता गेल्या नऊ वर्षांपासून तो काम करीत असल्याचे सांगण्यात आले.
योजनेचे सर्व अधिकारी, कर्मचारी कार्यालयात आले. सर्वजण त्या आरोग्य मित्राचा शोध घेऊ लागले; परंतु तो सापडला नाही. नातेवाइकांचा संताप पाहून लक्ष्मीपुरी पोलिसांसह सीपीआर रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकांना बोलाविण्यात आले. पोलिसांनी नातेवाइकांची समजूत काढून पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगून घरी पाठविले.