कोल्हापूर : भाजपचे पदाधिकारी आशिष कपडेकर यांनी पाच लाखांच्या खंडणीसाठी रुग्णालयाची बदनामी सुरू केल्याचा आरोप व्हीनस काॅर्नर परिसरातील साई होम मल्टी स्पेशालिटी हाॅस्पिटलचे डाॅ. राहुल गणबावले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
खंडणी मागितली असेल तर गणबावले यांनी माझ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार का दाखल केली नाही, हे रुग्णालय सुरू होऊन अडीच वर्षे झाली, आजपर्यंत त्यांनी ही तक्रार कधीच केली नाही. त्यामुळे वैफल्यग्रस्ततेतून आणि आम्ही चुकीच्या गोष्टी बाहेर काढल्यानेच ते खंडणीचा आरोप करत असल्याचे आशिष कपडेकर यांनी म्हटले आहे.
कपडेकर यांनी रक्कम मागितली तर शीतल भंडारी यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे माझ्या जीवितास धोका असून, रुग्णालय बंद करण्याचीही धमकी दिल्याचेही डाॅ. गणबावले यांनी सांगितले. कपडेकर यांना पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळेच त्यांनी आमच्या अपार्टमेंटमधील इतर गाळेधारकांना माझ्या विरोधात उभे केले आहे. सोेशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी नेत्यांचे संदर्भ देत धमकी दिली. माझे रुग्णालय बाॅम्बे नर्सिंग ॲक्टप्रमाणे नोंदणीकृत आहे. कोविड रुग्ण घेण्यास तीन मे २०२१ ला महापालिकेकडे परवानगी मागितली होती. मात्र, शनिवारी (दि. १५)पर्यंत महापालिकेकडून परवानगी देण्यात आलेली नाही. एकीकडे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी रुग्णालये कमी पडत आहेत. कोल्हापूरचा मृत्यूदर जास्त आहे. तरीही परवानगी का दिली जात नाही, अशी विचारणा डॉ. गणबावले यांनी केली.
कपडेकर व शीतल भंडारी यांनी सांगितले की, डाॅ. गणबावले यांनी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याबाबत एकही पुरावा त्यांच्याकडे नाही. कोविड रुग्णांचे मृतदेह त्यांनी परस्पर नातेवाइकांकडे दिले. याबाबत ते काही सांगत नाहीत. त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांचे सर्व पुरावे गोळा केले आहेत. चौकशी होईल त्यावेळी ते संबंधित यंत्रणेच्या हवाली करू.