सरूड : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक झालेल्या बदलांमुळे शाहूवाडी तालुक्यात सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, तांबड्या-पांढऱ्या पेशी कमी-जास्त होणे आदी विषाणूजन्य तसेच साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, या व्हायरल इन्फेक्शनमुळे नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शासकीय तसेच खासगी रुग्णालये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या गर्दीने हाऊसफुल्ल होत असल्याचे दिसून येत आहे .
लहान बालकांपासून तरुण तसेच वयस्कर नागरिक अशा सर्वच वयोगटातील नागरिकांना या व्हायरल इन्फेक्शनपासून उद्भवणाऱ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.
गेल्या तीन आठवडयांपासून पावसाने दडी मारल्याने वातावरणात अचानक बदल झाला .
या कालावधीमध्ये उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे नागरिकांना ऐन पावसाळ्यात वैशाख वणव्याचा अनुभव आला. तसेच अनेक ठिकाणी घराशेजारील परिसरात, नाल्यांत व डबक्यात सांडपाणी साचून राहत असल्याने अस्वच्छतेमुळे डासांची उत्पत्तीही वाढली आहे. वातावरणातील बदल व परिसरातील अस्वच्छता याचा विपरित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश गावात सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, जुलाब, तांबड्या-पांढऱ्या पेशी कमी-जास्त होणे आदी विषाणूजन्य आजारांचा मोठया प्रमाणावर फैलाव होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आल्या असल्या, तरी या व्हायरल इन्फेक्शनमुळे आजारी पडणाऱ्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.