कोल्हापूर : येथील विभागीय क्रीडासंकुलामध्ये बांधण्यात आलेल्या त्या बहुचर्चित जलतरण व डायव्हिंग तलावावर आता बॅडमिंटन कोर्ट व वसतिगृह बांधण्याचा पर्याय पुढे आला आहे; तर त्या तलावावर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीची जबाबदारी कोणाची, असा सवाल क्रीडाप्रेमींकडून विचारली जात आहे.
संभाजीनगर रेसकोर्स नाकाजवळील कैद्याच्या शेतालगत बांधण्यात आलेल्या क्रीडासंकुलातील जलतरण तलाव व डायव्हिंग तलावाची चर्चा संपता संपेना. आता या दोन्ही तलावांवर बॅडमिंटन कोर्ट आणि वसतिगृह बांधण्याचा पर्याय पुढे आला आहे. त्यातील पाणीसाठा मैदानासाठी वापरला जाणार आहे. नवीन दोन्ही तलाव टेनिस कोर्टाच्या मागील बाजूस असणाऱ्या सुमारे पावणेदोन एकरांत बांधला जाणार आहे.
त्याकरिता प्रस्ताव, निधी अशी प्रक्रिया पूर्णत्वाकडे आली आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात या नव्या तलावांमध्ये जलतरणपटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानकांप्रमाणे सराव करता येणार आहे. या शासन निर्णयाचे क्रीडाप्रेमींकडून स्वागत होत आहे. तरीसुद्धा यापूर्वी या तलावांवर झालेल्या खर्चाचे काय, असा सवाल क्रीडाप्रेमींकडून विचारला जात आहे.मग दोषी कोण?संकुलातील जलतरण व डायव्हिंग तलावासाठी जागेबाबत क्रीडासंकुल समितीने सांगितल्याप्रमाणे वास्तुविशारदाने त्याच ठिकाणचा अभ्यास न करता आराखडा तयार केला आणि त्यानुसार बांधकामही पूर्ण झाले. संपूर्ण बांधकाम झाल्यानंतर त्यातून जमिनीतून उमाळे व अशुद्ध पाणी मिसळू लागले. लागलेली गळती काढण्याचा गेल्या अनेक वर्षांत, अनेक वेळा प्रयत्न झाला; पण ते काही दुरुस्त होऊ शकले नाही. त्यामुळे आता तर जलतरण तलावांची जागाच बदलण्यात आली आहे. याशिवाय ‘आयआयटी’च्या तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. त्यांची व्हिजिट फी लाखांत होती. त्यांनी दिलेल्या अहवालाचाही काहीच उपयोग झाला नाही. एवढे सर्व करूनही हे दोन्ही तलाव बिनकामाचेच राहिले. आतापर्यंत झालेल्या खर्चाची जबाबदारी कोणाची, असा सवाल क्रीडाप्रेमींकडून विचारला जात आहे.
या दोन तलावांवर झालेला खर्च वाया गेला आहे. त्यामुळे त्याला जबाबदार असणाºया तत्कालीन अधिकाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी.- सुहास साळोखे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष क्रीडा सेलझालेल्या नुकसानीप्रकरणी क्रीडा खात्याने दोषी अधिकारी, तज्ज्ञ वास्तुविशारद, अभियंत्यांवर जबाबदारी निश्चिती करून त्यांच्या संपत्तीवर बोजा चढवावा.- अशोक पोवार, क्रीडाप्रेमी