चंदगड : भाडोत्री इमारतीतून होसूर (ता. चंदगड)च्या ग्रामपंचायतीला हक्काची इमारत मिळणार असल्याने कित्येक वर्षांचे स्वप्न लवकरच पूर्ण होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
होसूर ग्रामपंचायतीची स्थापना २००८ मध्ये झाली. ग्रामपंचायतीकडे हक्काची जागा होती. मात्र, इमारत नव्हती. सुरुवातीला भाडोत्री घरात ग्रामपंचायत कार्यालय थाटण्यात आले. त्यानंतर मराठी शाळेत कार्यालय स्थलांतर करण्यात आले व आता पुन्हा भाडोत्री घरात कार्यालय सुरू आहे.
मात्र, गावाला नवीन ग्रामपंचायत कार्यालयीन इमारत मिळावी यासाठी आमदार राजेश पाटील यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते एस. एल. पाटील, सरपंच राजाराम नाईक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, होसूर विकास मंचचे सर्व पदाधिकारी यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार आमदार पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून २० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे होसूरकरांना दिलेला शब्द आमदार पाटील यांनी पाळला, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
चौकट : आमदार राजेश पाटील यांच्याकडून वचनपूर्ती
आमदार राजेश पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयास शासनाकडून निधी आणण्याचे वचन दिले होते. त्याप्रमाणे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यांच्या आदेशाने गावास तब्बल २० लाखांचा निधी मंजूर झाला. त्यांपैकी पहिला हप्ता म्हणून साडेसात सात लाख रुपये तत्काळ ग्रामपंचायतीला वर्ग करण्यात आले आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आमदार राजेश पाटील यांनी तातडीने मदत केल्याने ग्रामपंचायतीला हक्काची इमारत मिळणार आहे.
चौकट :
प्रयत्नांना यश आल्याचे समाधान
गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या गावाला हक्काचे ग्रामपंचायत कार्यालय नव्हते. मात्र, आमदार राजेश पाटील यांच्या सहकार्याने ते मिळणार आहे. त्यामुळे आमच्या पाठपुराव्याला यश आल्याने समाधान वाटत असल्याची भावना उपसरपंच छाया पाटील यांनी व्यक्त केली.
छाया पाटील, उपसरपंच, होसूर.
-----------------------
छाया पाटील : ०४०७२०२१-गड-०७