कोल्हापूर : हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण करून ठार मारण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी सातजणांना आज, गुरुवारी अटक केली. संशयित दिलीप व्यंकटेश दुधाणे (वय ३१), किशोर दट्टाप्पा माने (२४), किरण दट्टप्पा माने (२१), तानाजी गोपीनाथ मोरे (२९), करण राजू जाधव (२०), अर्जुन चंद्रभान पोवार (२५, सर्वजण, रा. माकडवाला वसाहत, इंदिरानगर झोपडपट्टी, शिवाजी पार्क), रोहन रघुनाथ पाटील (२९, रा. आपटेनगर) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले, फिर्यादी राजकुमार सुनील खोत (वय २३, रा. राजारामपुरी १४ वी गल्ली) यांचा हॉटेल व्यवसाय आहे. संशयित आरोपी दिलीप दुधाणे व किशोर माने यांनी दोन महिन्यांपूर्वी खोत यांचा भाऊ सत्यजित याचा मित्र गौतम काकडे याच्याकडे ३० हजार रुपयांची खंडणी मागत त्याच्या हातातील किमती घड्याळ काढून घेतले. त्यानंतर आज पुन्हा त्यांनी सत्यजित व गौतमला राजारामपुरी आठव्या गल्लीमध्ये घड्याळ परत घेऊन जाण्यासाठी बोलाविले. यावेळी घरगुती अडचणीमुळे गौतम गेला नाही. सत्यजित दुपारी दोनच्या सुमारास आपल्या चारचाकी गाडीतून बोलाविलेल्या ठिकाणी गेला. यावेळी त्याने भाऊ राजकुमार यांना फोन करून दुधाणे व माने हे चार-पाच साथीदारांसमवेत थांबले असल्याचे सांगितले. त्यानंतर ते त्याठिकाणी गेले. त्यांनी सत्यजित कुठे आहे, अशी चौकशी केली असता त्यांना गळपट्टीस धरून जबरदस्तीने गाडीत बसविले तेथून यांना संगम टॉकीजच्या पडक्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर नेले. पाच लाख रुपये कोणाकडून तरी मागवून घे नाही तर तुला ठार मारेन, अशी धमकी त्यांनी दिली. यावेळी त्यांनी दोन लाख जमवून आणून देतो, असे सांगून रात्री आठच्या सुमारास आपली सुटका करून घेतली. पैसे आणण्यासाठी जातो म्हणून ते थेट शाहूपुरी पोलीस ठाण्यात आले. याठिकाणी त्यांनी सात जणांच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अपहरण, खंडणीचा गुन्हा दाखल करून संशयितांना अटक केली. या प्रकरणी अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव व साहाय्यक फौजदार व्ही. आर. गेंजगे करत आहेत. (प्रतिनिधी)
हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण
By admin | Published: July 25, 2014 12:46 AM