कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल झाल्याने बुधवारी रात्री हॉटेल्स, बार हाऊसफुल्ल असल्याचे चित्र शहरात पाहावयास मिळाले. गेले महिनाभर रात्री साडेदहा वाजता हॉटेल्स बंद केली जात होती. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे रात्री साडेदहा वाजता हॉटेल्स आणि बार बंद केले जाऊ लागल्याने या व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता. एकीकडे सुट्ट्या सुरू झाल्या असतानाही म्हणावा तसा या व्यवसायामध्ये उठाव दिसत नव्हता. अशातच बाहेरगावांहून येणाऱ्या प्रवाशांनाही याचा फटका बसत होता.अनेक खासगी कंपन्यांच्या रात्री होणाऱ्या बैठका, कार्यक्रम, गेट टुगेदर असे कार्यक्रमही आचारसंहितेच्या बडग्यामुळे पुढे ढकलण्यात आले होते. अशातच मंगळवारी (दि. २३) मतदान झाल्याने बुधवारी आचारसंहिता शिथिल झाली. त्यामुळे रात्री शहरातील विविध हॉटेल्स आणि बारवर गर्दी झाली होती. सगळे गोळा होण्यातच दहा वाजायचे. मग हॉटेलात जाऊन काय करायचे या मानसिकतेतून गेले महिनाभर अनेक जण हॉटेलमध्ये किंवा बारमध्ये जात नव्हते; पण ही गर्दी बुधवारी पाहावयास मिळाली.
बुधवार असल्याने जास्त गर्दीआचारसंहिता शिथिल झाल्यानंतरचा पहिला वार म्हणजे बुधवारच आल्याने हॉटेल्समध्ये जेवणासाठी तसेच बारमध्येही गर्दी उडाली होती. या दिवशी शक्यतो कोणाचाही उपवास नसल्याने ही गर्दी वाढल्याचे सांगण्यात आले.