कोल्हापूर: मराठ्यांना अंधाराच्या खाईत लोटणाऱ्या सरकारचा प्रतीकात्मक निषेध म्हणून येत्या ९ जूनला कोल्हापुरात रात्री ८ ते ९ या वेळेत सर्व लाईट तासभर बंद करून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला जाणार आहे. सकल मराठा शौर्यपीठाच्या शनिवारच्या सर्वधर्मीय व बारा बलुतेदारांच्या एकत्रित बैठकीत समन्वयक प्रसाद जाधव यांनी आंदोलनाची घोषणा केली.
प्रसाद जाधव म्हणाले की, आम्ही दसऱ्याला पुजलेली शस्त्रे संभाजीराजेंच्या विनंतीमुळे म्यान केली असली, तरी खाली ठेवलेली नाही. पुढील दहा दिवसांत थेट रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू होणार आहे. आरक्षण लढ्याचे नेतृत्व संभाजीराजे यांनी स्वीकारले आहे, त्यांच्या सर्व भूमिकांना सकल मराठा शौर्यपीठाचा पाठिंबाच राहणार आहे.
मराठा आरक्षण लढ्याचे प्रमुख म्हणून संभाजीराजे व मराठा आरक्षण समितीचे माजी अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका व्यासपीठावर यावे, स्वतंत्र बोलण्याऐवजी एकत्रितपणे निर्णय घ्यावेत, असा ठराव बैठकीत करण्यात आला. बैठकीला प्रकाश सरनाईक, अरुण खोडवे, अजित पोवार,अत्तरभाई इनामदार, किशोर घाटगे, अवधूत भाटे, गणेश शिंदे, सरिता पोवार, शिवाजीराव लोढे, चंद्रकांत चिले, सुशांत बोरगे, हेमंत साळोखे, रविराज निंबाळकर, राजू जाधव, मनोहर सोरप अशी सर्वधर्मीयातील प्रतिनिधींची उपस्थिती होती.
चौकट
महावितरण व मनपाला निवेदन
एक तासाचे ब्लॅक आऊट होणार असल्याने महावितरणने सहकार्य करावे, यासाठी त्यांना आज रविवारी सकल मराठाचे शिष्टमंडळ भेटणार आहे. याशिवाय महापालिकेची भेट घेऊन स्ट्रीट लाईट बंद करण्याचीही विनंती केली जाणार आहे.
बैठकीतील ठराव
मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा
अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ पूर्ववत करा
सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी
क्युरिटिव्हा पिटिशन दाखल करून केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा.
फोटो: २९०५२०२१-कोल-सकल मराठा
फोटो ओळ: कोल्हापुरात शनिवारी संध्याकाळी सकल मराठा शौर्यपीठाने मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत प्रसाद जाधव यांनी मार्गदर्शन केले. या वेळी सर्वधर्मीय व बारा बलुतेदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
(छाया: आदित्य वेल्हाळ)