कोल्हापूर: घर, पडझडीचे पंचनामे प्राधान्याने करण्याचे शासन आदेश असल्याने लांबणीवर पडलेले शेती पंचनामे अखेर बुधवारपासून सुरू झाले. सर्वाधिक नुकसान झालेल्या शिरोळ तालुक्यातून पंचनाम्याचा श्रीगणेशा करण्यात आला. कृषी, महसूल, जिल्हा परिषद या तीन यंत्रणांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या त्रिसदस्यीय समितीकडून पाहणीचे नियोजन केले आहे.जिल्ह्यात २२ ते २४ जुलै या कालावधीत झालेल्या ढगफुटीसारख्या पावसामुळे आलेल्या महापुरात नदीकाठासह पूरग्रस्त भागातील ५८ हजार ५०० हेक्टरवरील पिके जमिनदोस्त झाल्याचा नजरअंदाज अहवाल कृषी विभागाने तयार केला होता. त्यानुसार प्राथमिक टप्प्यावर ६६ कोटींचे नुकसान गृहीत धरण्यात आले होते, पण महापूर ओसरण्याचा वेग कमी झाल्याने नुकसानीची टक्केवारी वाढतच गेली आहे.
पिके कुजल्याचे दिसत असतानाही प्रत्यक्षात कृषी विभागाकडून पंचनामे सुरू होत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत होती, पण घर आणि पडझडीच्या पंचनाम्यांना प्राधान्य द्यावे, असे शासन आदेश आल्याने कृषी विभाग गेले आठ दिवस बऱ्यापैकी शांत होता. महसूल व गावपातळीवरील यंत्रणाही त्याच पंचनाम्यात गुंतल्याने कृषी विभागाकडे यंत्रणाच उपलब्ध नव्हती. अखेर हे पंचनामे बऱ्यापैकी मार्गी लागल्यानंतर बुधवारपासून प्रत्यक्षात शेतीच्या पंचनाम्यांना हात घालण्यात आला आहे.महसूलकडून तलाठी, जिल्हा परिषदेकडून ग्रामसेवक व कृषी विभागाकडून कृषी सहाय्यक असे पथक तयार करून त्यांच्याकडे किमान ३ ते कमाल १५ गावे देऊन पंचनामे करण्यास सांगण्यात आले. बुधवारी शिरोळ तालुक्यातील ५२ पूरग्रस्त गावांपैकी ४३ गावांमध्ये या पथकाकडून पाहणीचे काम सुरू झाले.१५ दिवसांपासून पिके पाण्याखालीगेल्या १५ दिवसांपासून पिके पाण्याखाली असल्याने अक्षरश: चिखल झाला आहे. अशा परिस्थीतीत शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्य सरकारने मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे, पण अद्याप शेतीचे पंचनामेच सुरू झाले नसल्याने नुकसानीचा अंदाज येत नव्हता.पावसाचा व्यत्यय तरी पाहणीजिल्ह्यातील बहुतांशी पिकांचे नुकसान हे नदीकाठावरचे झाले आहे. पण अजूनही पाणी ओसरलेले नाही, शिवाय जेथे पाणी ओसरले आहे, तेथेही मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. तेथे जाणे अवघड आहे शिवाय आता पुन्हा पाऊस सुरू झाल्याने शिवारापर्यंत पोहचणे हेच मोठे दिव्य आहे, तरीदेखील तपासणी पथक तेथेपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करत आहे.