सांगरूळ : चैत्र यात्रेतील विरोधी गटाच्या मिरवणुकीचे निमित्त पुढे करून गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे व काँग्रेसचे सहसचिव बाजीराव खाडे यांनी आपल्या चार बंधू व मुलांसह माझ्या घरावर हल्ला केला. यावेळी माझ्या आई-वडील व भावजयीला अर्वाच्य शिवीगाळ करत भाऊ सरदारला गंभीर जखमी केले. मला जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे कुंभी कासारी कारखान्याचे संचालक राहुल खाडे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांचे बंधू सरदार विश्वनाथ खाडे यांनी यासंबंधी रात्री उशिरा करवीर पोलिसांत तक्रार दिली.गावांत गोकुळचे संचालक खाडे यांचा काँग्रेसला मानणारा गट आहे. राहुल खाडे हे शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके गटाचे आहेत. कुंभी-कासारी कारखान्याच्या निवडणुकीपासून त्यांच्यातला संघर्ष जास्त उफाळला आहे. बुधवारी सांगरूळमध्ये मोठ्या प्रमाणात चैत्र यात्रा भरली. या चैत्र-यात्रेसाठी पालखी सोहळा व धार्मिक कार्यक्रमाच्या दृष्टीने गावातील तरुण मंडळांनी मिरवणूक काढण्याचा बेत आखला होता. यात कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी गावातील सत्ताधारी व विरोधी गटांनी करवीर पोलिस ठाण्यात बसून तोडगा काढला.पोलिसांनी दोन्ही गटांना सामाजिक भान ठेवून मिरवणूक काढण्याची परवानगी दिली. सायंकाळी निघालेल्या मिरवणुकीत कोणताही वादाचा प्रसंग घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता. सायंकाळी साडेसात वाजता दोन्ही गटांच्या वेगवेगळ्या ठिकाणी मिरवणुका सुरू झाल्या व त्या शांततेत निघाल्या.गुरुवारी कामानिमित्त कोल्हापूरला गेलो होतो. सकाळी मला सरपंचांचे पती बदाम खाडे यांनी फोनवरून जिवे मारण्याची धमकी देत घरात आलो आहे. तू कुठे आहेस..? अशी विचारणा केली. दरम्यान गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, बाजीराव खाडे, बदाम खाडे, प्रकाश खाडे, विवेक खाडे यांनी सकाळी ९:३० वाजता दारात येत शिवीगाळ सुरू केली. यावेळी माझे आई-वडील भाऊ आणि भावजाई घरात होते. त्यांना घरात घुसून शिवीगाळ करत मारहाण सुरू केली व माझ्या भावावर काठ्यांनी मारहाण करून त्याला गंभीर जखमी केल्याची तक्रार राहुल खाडे यांनी केली.
पाचजणांवर गुन्हा
पालखीची मिरवणूक का काढली, अशी विचारणा करीत घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी सरदार विश्वनाथ खाडे (वय ४०) यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी बाळासाहेब नानू खाडे (वय ५५), बाजीराव नानू खाडे (५०), बदाम खाडे (४०), प्रकाश खाडे (४०) आणि विवेक खाडे (२६) यांच्यावर गुन्हा दाखल केला. हल्लेखोरांनी राहुल खाडे यांना जिवे मारण्याची धमकी दिली असून, घरातील महिलांना धक्काबुक्की केल्याचा आरोप फिर्यादी सरदार खाडे यांनी केला आहे.
सांगरूळ गावात सर्वांनी एकत्र येत गावात सलोख्याचे वातावरण राहावे यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत असतो तरी राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून आमच्यावर चुकीचे आरोप करू नयेत. -बाजीराव खाडे, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव