लोकमत न्यूज नेटवर्ककुरुंदवाड : नगराध्यक्ष व स्थायी समिती सदस्यांचा पुढाकार अन् लाभार्थ्यांच्या मनाचा मोठेपणा यातून बेघर झालेल्या बबन शेट्टी यांना राजीव गांधी घरकुल आवास योजनेतून घर मिळाले आहे. त्यामुळे माय-लेकरू पुन्हा एकत्र येणार आहेत.येथील प्रभाग क्रमांक दोनमध्ये बबन भिमा शेट्टी आपल्या वृद्ध मातेसोबत राहतो. सहा बाय आठ जागेत दोन खोल्यांचे पोटमाळा असलेले जुने पांढऱ्या मातीतील घर आहे. इमारत जुनी झाल्याने एका खोलीचे छत पडले होते, तर पोटमाळाही शेवटच्या घटका मोजत होता. घर कधीही पडण्याची शक्यता ओळखून बबनची आई बोरगाव (कर्नाटक) येथील लेकीकडे राहण्यास गेली आहे. शेट्टी यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून चिरमुरे, फुटाने विकून तो घरचा चरितार्थ चालवितो. त्यामुळे घर दुरुस्त करण्याची त्याची ऐपतही नाही. शिवाय घराचे छत कोसळल्याने व आई लेकीकडे गेल्याने तुटलेल्या घराने माय-लेकरातही ताटातूट झाली होती.शेट्टी याने राजीव गांधी घरकुल आवास योजनेतून घर मिळावे, यासाठी अर्ज केला होता. मात्र, पालिकेने वेळेत अर्ज न दिल्याने त्याचा अर्ज फेटाळला होता. पालिकेला सात घरकुल मंजूर झाले होते. मात्र, आलेल्या अर्जात केवळ पाचच अर्ज पात्र ठरल्याने पालिका प्रशासनाने उर्वरित दोन घरकुलांसाठी नव्याने प्रस्तावाची मागणी केली होती. त्यामुळे घरकुल मिळावे यासाठी ४७ प्रस्ताव आले होते.पालिकेने मंगळवारी सभागृहात स्थायी समितीची बैठक बोलावून घरकुलाचे लकी ड्रॉद्वारे दोन लाभार्थी निवडण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी ४७ प्रस्तावांपैकी ३४ प्रस्ताव पात्र ठरले होते. त्यातून दोन लाभार्थी काढण्यात येणार होते. यावेळी नगराध्यक्ष जयराम पाटील, उपनगराध्यक्ष जवाहर पाटील, आरोग्य सभापती दीपक गायकवाड, प्रा. सुनील चव्हाण यांनी बबन शेट्टी पूर्णपणे बेघर झाले असून, दोन पैकी एका घरकुलाची त्यांना लाभ देण्याचा प्रस्ताव मांडला. यावेळी शेट्टी यांनीही स्वत:ची परिस्थिती सांगून घरकुल देण्याचे भावनिक आवाहन केले होते.नशिबाची साथघरकुल लाभार्थ्यांसाठी एक घरकुल शेट्टी यांना मिळाल्याने एकच चिठ्ठी काढण्यात आली. नोमार बागवान या पाच वर्षांच्या बालकाने ही चिठ्ठी काढली. यामध्ये सुवर्णा बाबासो बंडगर यांचे नाव निघाले. बाबासो यांचे आठ दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. मात्र, त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाला नशिबाने घरकुल मिळाल्याची चर्चा शहरात होती.पालिकेकडून शूटिंगघरकुल वाटप व लकी ड्रॉचे पालिका प्रशासनाने शूटिंग केले आहे. जेणेकरून लाभार्थी अथवा इतर कोणीही याची तक्रार करू नये. यावेळी मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, बांधकाम अभियंता शशिकांत पोवार, निशिकांत ढाले यांच्यासह पालिका कर्मचारी उपस्थित होते.
अन् माय-लेकराला मिळणार हक्काचं घर
By admin | Published: June 08, 2017 1:12 AM