कोल्हापूर : पूरबाधित क्षेत्रातील २० पेक्षा अधिक फ्लॅट असलेल्या इमारतींमध्ये यापूर्वीची महापुराची परिस्थिती विचारात घेऊन सुरक्षेची उपाययोजना म्हणून रेस्क्यू बोट, लाईफ जॅकेट्स, लाईफ रिंग व इमर्जन्सी लाईट, इत्यादी उपकरणे संबंधित गृहप्रकल्पांचे विकसक यांच्याकडून तातडीने उपलब्ध करून घेण्याच्या सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नगररचना विभागास मंगळवारी दिल्या.
कोल्हापूर शहरात गतवर्षी उद्भवलेली महापूर स्थिती विचारात घेऊन आगामी काळातील परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी आयुक्तांनी संबंधित विभागांची मान्सूनपूर्व आढावा बैठक निवडणूक कार्यालय येथे घेतली. त्यावेळी या सूचना त्यांनी दिल्या.
जलसंपदा विभागाने पूररेषा निश्चित करून दिली असून, त्यानुसार पूररेषेत येणाऱ्या गृहप्रकल्पांना सुरक्षेकरिता रेस्क्यू बोट, लाईफ जॅकेट्स, लाईफ रिंग, दोर व इमर्जन्सी लाईट, इत्यादी साधनसामग्री पावसाळ्यापूर्वी घेण्याबाबत नोटिीसा द्याव्यात तसेच ३१ मेपर्यंत नगररचना विभागाने संबंधित गृहप्रकल्पाच्या ठिकाणी सुरक्षिततेबाबत केलेल्या उपाययोजनेचा अहवाल सादर करावा, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.
शहर अभियंता व उपशहर अभियंता यांनी शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण तातडीने करून घ्यावे. पूरबाधित क्षेत्रामध्ये बोटी ने-आण करण्यासाठी रुट नकाशा तयार करावा, अशा सूचनाही यावेळी दिल्या.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, साहाय्यक आयुक्त चेतन कोंडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, साहाय्यक संचालक नगररचना प्रसाद गायकवाड, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, आपत्ती व्यवस्थापन तथा मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, उपशहर रचनाकार नारायण भोसले, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, रमेश मस्कर, बाबूराव दबडे, रावसाहेब चव्हाण, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील उपस्थित होते.