कोल्हापूर : ‘महापालिकेतील घरफाळा घोटाळा प्रकरणात कोणीही, काहीही सांगितले तरी मुळाशी जाऊन या प्रकरणाची चौकशी केली जाईल. दोषी असणाऱ्या कोणाही अधिकाऱ्यास व कर्मचाऱ्यास सोडणार नाही,’ अशी स्पष्ट ग्वाही आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाला दिली.तुम्ही फक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यावर विश्वास ठेवा. मी पारदर्शक तसेच भ्रष्टाचारमुक्त प्रशासन असा कारभार करीत आहे. घरफाळा प्रकरणातही कोणाला पाठीशी घातले जाणार नाही. फक्त आठ ते दहा दिवस थांबा, असेही आयुक्तांनी सांगितले.महानगरपालिकेतील घरफाळा विभागातील भ्रष्टाचारप्रकरणी सर्वपक्षीय घरफाळावाढ व भ्रष्टाचारविरोधी कृती समितीचे एक शिष्टमंडळ बाबा इंदुलकर, माजी महापौर आर. के. पोवार यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना भेटले आणि त्यांनी दोन मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी दिलीप पवार, बाबा पार्टे उपस्थित होते.सन २०११ पासून घरफाळ्यासाठी भांडवली मूल्यांवर आकारणी सुरू केली तेव्हापासून भाडेकरूंचा भारांक लावता येत नाही; तरीही तो लावला जात आहे. ही पद्धत चुकीची आहे. याबाबत राज्य सरकारच्या नगरविकास विभागाचा अभिप्राय मागवून घ्या, अशी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बाबा इंदुलकर यांनी निदर्शनास आणून दिले.
गेल्या काही दिवसांपासून या घोटाळ्याची चौकशी सुरू असून, त्यातून काय निष्पन्न झाले याची माहिती जाहीर करा, अशी मागणीही त्यांनी केली. आर. के. पोवार यांनी ही चौकशी लवकरात लवकर पूर्ण करून संंबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असा आग्रह धरला.
आयुक्त कलशेट्टी यांनी सांगितले की, ‘या प्रकरणाची जेव्हा मला माहिती कळली तेव्हा तत्काळ अधिकाऱ्याची बदली करून सर्व कर्मचाऱ्यांच्या लिंक बंद ठेवल्या आहेत. चौकशी समितीही नेमली आहे. माझी स्वत:चीच कारकिर्द स्वच्छ आहे; त्यामुळे भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्यावर माझा जोर आहे. चौकशी समितीचे कामकाज सुरू आहे. सदरचे काम पूर्ण होऊ द्या. माझ्यावर विश्वास ठेवा, या प्रकरणात कोणीही असले तरी त्यांना पाठीशी घातले जाणार नाही.’
इंदुलकरांवर आयुक्त उसळलेचर्चेदरम्यान घरफाळा विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार होतो आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळत कसे नाही? तुम्ही महापालिकेत आल्यापासून महापालिका भ्रष्टाचारमुक्त करतो, असे एकदाही म्हटला नाहीत, असे बाबा इंदुलकर म्हणताच आयुक्त कलशेट्टी त्यांच्यावर चांगलेच उसळले.भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाबाबत माझा नोकरीच्या पहिल्या दिवसापासून आग्रह राहिला आहे. ते वारंवार जाहीर करून मला काही प्रसिद्धी मिळवायची नाही. महापालिका भ्रष्टाचारमुक्त करणार आहे, यात शंका घेऊच नका. मी प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेतो. महापालिका माझी आई आहे. तिचे नुकसान होऊ देणार नाही, अशा शब्दांत कलशेट्टी यांनी बाबा इंदुलकरांना बजावले.