कोल्हापूर : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवरील निर्बंधाबाबत शासनाकडून अंतिम निर्णय आलेला नसल्याने कोल्हापुरातील कुंभारांनी या प्रकारातील मूर्तींचे ५० टक्के कास्टिंग पूर्ण केले आहे. त्यामुळे यंदादेखील प्लास्टरबंदीचा निर्णय अमलात येण्याची शक्यता नाही, तर काही कुंभारांनी यावर पर्याय काढत पूर्णत: शाडूच्या, तसेच प्लास्टर व शाडूमिश्रित गणेशमूर्ती बनवल्या आहेत.
यंदा १० सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी आणली आहे. त्यावर्षी जिल्ह्यात महापूर आला आणि गेल्यावर्षी कोरोनाने सगळ्यांचे आर्थिक गणित कोलमडले. त्यामुळे राज्य शासनाने या दोन वर्षांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना बंदीतून सूट दिली होती. आतादेखील कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. प्लास्टरच्या गणेशमूर्तींवरील बंदी हटवावी यासाठी दोन महिन्यांपूर्वी कुंभारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी लोकप्रतिनिधींनी याबाबत केंद्र व राज्य शासनासोबत चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले हाेते.
कुंभारबांधवांनी वारंवार मागणी करूनदेखील यावर निर्णय देण्यात आला नाही. आता गणेशोत्सवाला २ महिने राहिले आहेत. सध्या पावसाळा सुरू असल्याने गणेशमूर्ती लवकर वाळत नाहीत. त्यामुळे कुंभारांनी उन्हाळ्यातच अर्धे काम पूर्ण केले आहे. सध्या सर्वच कुंभार कुटुंबांमध्ये प्लास्टरच्या गणेशमूर्तींचे कास्टिंगचे काम पूर्ण झाले आहे. काही कुंभारांनी सावधगिरी घेत केवळ शाडूच्या गणेशमूर्ती बनवल्या आहेत, तर अनेक जणांनी शाडू व प्लास्टरमिश्रित गणेशमूर्ती बनवल्या आहेत. त्यामुळे यंदादेखील प्लास्टरबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता नाही.
---
मंडळांच्या ४ फुटांच्या मूर्ती
गणेशोत्सवापर्यंत कोरोनाची स्थिती काय असेल, यावर या सार्वजनिक गणशोत्सवाचा निर्णय अवलंबून असणार आहे. तरीदेखील कुंभारांनी मंडळांसाठी ४ फुटांपर्यंतच्या मूर्ती तयार केल्या आहेत. मंडळे व घरगुती या दोन्हीतील बहुतांशी मूर्ती या शाडू व प्लास्टरमिश्रित आहेत. त्यामुळे प्लास्टरबंदीचा निर्णय झाला, तर या मूर्तींचे काय करायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर असणार आहे.
---
सूट देण्याची मागणी
महापूर आणि कोरोनामुळे गेली दोन वर्षे आमच्यासाठी अत्यंत वाईट ठरले आहेत. त्यातच शाडूची अनुपलब्धता व खर्च परवडणारा नाही, गणेशोत्सवावरच वर्षभराची उलाढाल अवलंबून असते. त्यामुळे यंदादेखील शासनाने प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींवरील बंदीतून सूट द्यावी, अशी मागणी कुंभारबांधवांनी केली आहे.
--
फोटो नं २४०६२०२१-कोल-गणेशमूर्ती
ओळ : गणेशोत्सवाला आता दोन महिने राहिल्याने गुरुवारी कोल्हापुरातील कुंभार गल्लीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचे काम सुरू होते. (छाया : नसीर अत्तार)
--