अर्थ व्यवस्था मोडीत काढून आत्मनिर्भर कसे बनणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 01:13 PM2020-10-16T13:13:22+5:302020-10-16T13:15:05+5:30
congress, kolhapurnews, rally कामगार, कृषी क्षेत्रासह देशाची अर्थव्यवस्था मोडीत काढून देश आत्मनिर्भर कसा बनवणार, असा सवाल कॉंग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी गुरुवारी शेतकरी बचाव रॅलीत भाजप सरकारला विचारला. या व्हर्च्युअल रॅलीत कॉंग्रेसचे राज्यातील अनेक नेते सहभागी झाले होते.
कोल्हापूर : कामगार, कृषी क्षेत्रासह देशाची अर्थव्यवस्था मोडीत काढून देश आत्मनिर्भर कसा बनवणार, असा सवाल कॉंग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी गुरुवारी शेतकरी बचाव रॅलीत भाजप सरकारला विचारला. या व्हर्च्युअल रॅलीत कॉंग्रेसचे राज्यातील अनेक नेते सहभागी झाले होते.
शेतकरी व कामगार विरोधी कायदे राज्यसभेत बहुमत नसतानाही भाजप सरकारने मंजूर करुन घेतले. संसदेच्या मर्यादांचे त्यांनी उल्लंघन केले. संविधानाची त्यांनी टर उडविली, असे पाटील म्हणाले. दिवसरात्र कष्ट करून शेती पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची जमीन कोणी उद्योगपतींच्या घशात घालणार असेल तर कॉंग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही, त्याविरुद्ध देशभर आंदोलन केले जाईल, असेही पाटील म्हणाले.
मंत्री बाळासाहे थोरात यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात एक कोटी सह्यांची मोहीम सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले. १४ नोव्हेंबर रोजी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी राष्ट्रपतींची भेट घेऊन एक कोटी शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन देणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
केंद्रात लबाडांचे सरकार
केंद्रातील सरकार हे लबाडांचे सरकार असून, त्यांनी आतापर्यंत जनतेला फसविण्याचे काम केले. असा आरोप मंत्री अशोकराव चव्हाण यांनी केला. सगळी क्षेत्रं व्यापाऱ्यांना विकण्याचा यांचा प्रयत्न असून शेतकरी, कामगार यांना देशोधडीला लावणाऱ्या हुकूमशाही मोदी सरकारला चोख उत्तर देण्यास सज्ज राहा, असे आवाहन त्यांनी केले.
रॅलीत मंत्री नितीन देसाई, विजय वडेट्टीवार, के. सी. पाडवी, सुनील केदार, अमित देशमुख, यशोमती ठाकूर यांची भाषणे झाली. प्रारंभी बसवराज पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर मुझफ्फर हुसेन यांनी आभार मानले.