म्हाकवे : जादा प्रश्न विचारणाऱ्याला नव्हे, तर प्रश्नांची उत्तरे देणाºयाला पहिला क्रमांक दिला जातो. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात अनेक समस्या जशाच्या तशा असताना एका खासगी संस्थेच्या माध्यमातून खासदार धनंजय महाडिक यांना संसदेत केवळ जास्त प्रश्न विचारलेत म्हणून ‘संसदरत्न’ दिला आहे. हे खासदार म्हणजे केवळ बोलाचीच कडी अन् बोलाचाच भात असून, त्यांनी आता ग्रामीण भागात किती विकासाची कामे केलीत याचे आत्मपरीक्षण करावे, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुखप्रा. संजय मंडलिक यांनी केले.हमीदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक ग्राहक संस्थेच्या माध्यमातून स्थापन केलेल्या ‘सदासाखर बझार’च्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा वारकरी महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील यांच्या हस्ते व गोकुळचे संचालक राजेश नरसिंगराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.गेल्या पाच वर्षांत ग्रामीण भागाला वाळीत टाकून खासदार महाडिक हे विमान सेवेच्याच मागे लागले आहेत. मात्र, ही सेवा सुरळीत चालू असण्याऐवजी बंद असल्याच्याच बातम्या अधिक आल्या. खासदारांना निधी कमी असला तरी त्यांच्या पदात ताकद असते. त्याचा वापर केल्यामुळेच स्व. मंडलिक यांनी गावागावांत विकासकामे केली असल्याचेही प्रा. मंडलिक यांनी सांगितले.एन. वाय. पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सिद्धनेर्लीच्या सरपंचपदी निवड झालेल्या सुरेखा पाटील यांचा सत्कार झाला. नगराध्यक्ष राजेखान जमादार, आर. डी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ‘सदासाखर’चे उपाध्यक्ष बंडोपंत चौगुले, वीरेंद्र मंडलिक, जि. प. सदस्य शिवानी विजयसिंह भोसले, आदी उपस्थित होते.
महाडिक यांनी ग्रामीण भागाचा किती विकास केला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:48 AM