संतोष मिठारी ।कोल्हापूर : नऊ दिवसांच्या महापुरामुळे कोल्हापूरमधील अनेकांचे संसार, प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले. पुराच्या पाण्यामध्ये पुस्तके, वह्या आणि शैक्षणिक साहित्यच वाहून गेल्याने शाळेला जायचे कसे?, असा प्रश्न जिल्ह्यातील शेकडो पूरग्रस्त विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे.
यावर्षी कोल्हापूरला महापुराचा मोठा तडाखा बसला. करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, आंबेवाडी; शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, राजापूर, घालवाड, कुटवाड, कनवाड, आदी गावे आठवडाभर पाण्याखाली राहिली. पुरामध्ये प्रापंचिक साहित्यासह विद्यार्थ्यांची दप्तरे, शैक्षणिक साहित्य वाहून गेले. काही पाण्यात बुडून खराब झाले आहे. त्यामध्ये गुणपत्रिका, विविध प्रमाणपत्रेदेखील आहेत. ते पाहून अनेक विद्यार्थ्यांना अश्रू अनावरण होत आहेत. शाळेला जायचे, तरी कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. पूरग्रस्तांना जिल्ह्यासह राज्यभरातून मदतीचे अनेक हात पुढे झाले आहेत.
त्यात अन्नधान्य, कपडे, ब्लँकेट, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. मात्र, शैक्षणिक साहित्याच्या मदतीचे प्रमाण अगदी कमी आहे. पुरामुळे मोडून पडलेला संसार उभारताना शैक्षणिक साहित्याचा खर्च बहुतांश पालकांना परवडणारा नाही. त्याची दखल घेऊन स्वयंसेवी संस्था, संघटना, दानशूर व्यक्ती, संस्थांनी शालेय साहित्याची मदत करण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे.संस्था, संघटनांना काय करता येईल?विविध संघटना, संस्थांनी राज्यभरातील अन्य संस्थांना आवाहन करून शैक्षणिक साहित्याची मदत संकलित करावी. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना आवाहन करून त्यांना आवश्यक असणाऱ्या साहित्याची नोंदणी करावी. जिल्ह्यातील मुख्याध्यापक संघ, शैक्षणिक व्यासपीठ, आदी शैक्षणिक संघटनांना शाळा, विद्यार्थी, आदींबाबतची माहिती आहे, अशा संघटनांनी या मदतकार्यासाठी पुढाकार घ्यावा. ज्या विद्यार्थ्यांची दहावी, बारावी, आदी अभ्यासक्रमांच्या गुणपत्रिका, प्रमाणपत्रे वाहून गेली आहेत. त्यांच्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, शिवाजी विद्यापीठाने विशेष मोहीम राबवून त्यांना गुणपत्रिका, प्रमाणपत्रांची दुसरी प्रत देण्याची कार्यवाही करावी.अशा स्वरूपातील मदतीची गरजपुराचे पाणी ओसरू लागल्याने मंगळवार (दि. १३)पासून बहुतांश शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, शैक्षणिक साहित्यच नसल्याने पूरग्रस्त विद्यार्थी शाळेला जाऊ शकलेले नाहीत. या प्रत्येक विद्यार्थ्याला किमान दोन डझन वह्या, पाठ्यपुस्तके, पाटी-पेन्सिल, पेन, कंपास, दप्तर अथवा बॅग या शैक्षणिक साहित्याच्या मदतीची गरज आहे. त्या दृष्टीने दानशूर संस्था, व्यक्तींनी मदतीचा हात द्यावा. त्यासाठी पितळी गणपती मंदिर परिसरातील केडीएमजी ग्रुपच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन स्वयंसेवक सुधर्म वाझे यांनी बुधवारी केले.