कोल्हापूर : इस्लामपूर येथील विवाहितेवर येथील सीपीआर रुग्णालयातच २२ एप्रिल रोजी रात्री उपचार झाल्याचे रुग्णालयाच्या प्रशासनाने शुक्रवारी मान्य केले. ही विवाहिता इस्लामपूरला पतीसोबत राहत असल्याचे सांगण्यात आले. परंतु तिच्या पोटातील अर्भकाची स्थिती कशी आहे, याबद्दल मात्र आरोग्य यंत्रणेकडे कोणतीच माहिती नाही.या महिलेचा रुग्णालयात दाखल होण्यामागे गर्भपात करणे हाच हेतू होता असे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे. पट्टणकोडोलीतील ज्या रुग्णालयात प्रथम तपासणी झाली त्या रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मीना बारवाडे व भूलतज्ज्ञ डॉ. नंदकुमार बनगे यांना जिल्हा शल्य चिकित्सकांनी शुक्रवारी नोटिसा बजावल्या व घडलेल्या प्रकाराबद्दल खुलासा करण्यास सांगितले.मूळची इस्लामपूरची ३१ वर्षांची विवाहिता २२ तारखेला पट्टणकोडोली येथील जननी सर्जिकल व मॅटर्निटी होममध्ये दाखल झाली होती. परंतु तोपर्यंत कुणीतरी पोलिस मदत कक्षाला फोन करून या महिलेचा बेकायदेशीर गर्भपात सुरू असल्याचे कळवले. त्यामुळे पोलिस तिथे गेले. त्यांनी तिला तेथून हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात नेले व तेथून सीपीआरमध्ये दाखल केले. ही महिला सीपीआरमध्ये रात्री ११:३० वाजेला दाखल झाली व १२:४० वाजता स्वत:हून निघून गेल्याचे प्रसूतिशास्त्र विभागाचे डॉ. भास्कर मूर्ती यांनी सांगितले.ते म्हणाले, ही महिला दाखल झाली तेव्हा ती अशक्त होती. तिची सोनोग्राफी केली असता तिच्या पोटात १६ आठवड्यांचे अर्भक होते. तिला विश्रांतीची गरज होती म्हणून सलाइनही लावले; परंतू तिच्या पतीने जबरदस्तीने डिस्चार्ज घेऊन तिला ते घेऊन गेले.
ही महिला त्यांच्या हुपरीतील नातेवाइकांकडे अगोदर आली होती. तिला दीड वर्षाची पहिली मुलगी आहे. तिचा नवरा कामगार असून सांगलीतील एका राजकीय नेत्याकडे तो काम करतो. अर्भकाचे लिंगनिदान १२ आठवड्यानंतर होते. त्यामुळे ते झाल्यानंतरच गर्भपात करण्याच्या इराद्यानेच हे कुटुंब आले होते का..? तिला त्या खासगी रुग्णालयात काही औषधे दिली होती का..? तिला पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता का, त्या अर्भकाची सद्य:स्थिती कशी आहे आणि त्या महिलेचीही सद्य:स्थिती कशी आहे, याबद्दल सरकारी आरोग्य यंत्रणेकडे कोणतीच माहिती नाही. तिचा गर्भपात झाला आहे की नाही हे देखील कुणालाच माहीत नाही. काहीच चुकीचे घडले नव्हते तर मग तिने कुणाला वाचवण्यासाठी घाईगडबडीत डिस्चार्ज घेतला यावरूनही संशय व्यक्त होत आहे.
सेवेत असूनही..स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. बारवाडे या लाइन बझारमधील सेवा रुग्णालयात सेवेत आहेत. भूलतज्ज्ञ डॉ. बनगे हे शिरोळला वैद्यकीय अधीक्षक आहेत. शिवाय त्यांच्याकडे इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयाचाही कार्यभार आहे. हे दोघेही राज्य शासनाच्या आरोग्य सेवेत असताना त्यांच्या रुग्णालयाचे नाव या प्रकरणात आल्याने त्यांच्याकडून खुलासा मागवण्यात आल्याचे सीपीआरच्या सूत्रांनी सांगितले.