कोल्हापूर : गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ बंद असलेला रंकाळा टॉवर-तांबट कमानपर्यंतचा रस्ता धूळखात पडून आहे. एकीकडे आय.आर.बी. कंपनीने हा रस्ता करण्यास दिलेला नकार आणि दुसरीकडे महापालिकेने अद्याप न काढलेली निविदा यामुळे नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शिवाजी पेठेतील नागरिक आम्ही अजून रस्त्याचा धुरळा किती दिवस खायचा अशी संतप्त विचारणा करत आहेत. नवीन रस्त्यासाठी नागरिकांना अजून दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.आय.आर.बी. कंपनी रंकाळा टॉवर ते तलवार चौक (इराणी क्रशर खण)पर्यंतचा रस्ता करणार होती; पण आय.आर.बी.ने काही कारणास्तव रस्ता करण्यास नकार दिला. कंपनीने महापालिकेकडे २५ कोटी रुपयांची बँक गॅरंटी दिली आहे. मध्यंतरी रंकाळा टॉवर-तांबटकमान रस्त्यावरील ड्रेनेजचे काम करण्यात आले. हे काम पूर्ण होऊन वर्षाचा कालावधी होऊन हा रस्ता तसाच धूळखात पडून आहे. धुळीमुळे अक्षरश: नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दीड महिन्यापूर्वी नागरिकांनी रास्ता रोको करून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. हा रस्ता माजी महापौर सुनीता राऊत व माजी उपमहापौर परीक्षित पन्हाळकर यांच्या प्रभागांत विभागला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आवाज उठविला. राजीनाम्याची धमकी दिली. त्यामुळे या रस्त्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला. त्यानंतर या भागातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या; पण पुढे कुठे घोडे पेंड खाल्ले हे समजत नाही. दरम्यान, रस्त्याचे काम अजूनही सुरु झालेले नाही. हा रस्ता होणार आहे की नाही हे तरी एकदा महापालिकेला खडसावून विचारा अशी विनंती त्याभागातील कांही नागरिकांनी ‘लोकमत’ कडे केली. काम सुरू होण्यास लागेल दीड महिनाया रस्त्यासाठी दोन-तीन दिवसांत निविदा काढणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. ८५० मीटरचा (सुमारे दीड किलोमीटर) हा रस्ता आहे. त्यामुळे निविदा प्रसिद्ध, त्यानंतर निविदेला मिळणारा प्रतिसाद आणि प्रत्यक्षात या रस्त्याचे काम सुरू होण्यास लागणारा अवधी यावरून किमान दीड ते दोन महिने रस्त्यासाठी लागणार असल्याचे दिसते.रस्ते अनुदानमधून या रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या निविदा लवकरच काढण्यात येतील. एप्रिलपूर्वी रस्त्याचे काम पूर्ण होईल.- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता, कोल्हापूर याप्रश्नी आज, शुक्रवारी आयुक्तांना भेटणार असून रस्ता न झाल्यास प्रसंगी राजीनामा देऊ.-परिक्षित पन्हाळकर, माजी उपमहापौर, कोल्हापूर.रंकाळा टॉवर-तांबट कमान हा रस्ता शंभर टक्के पूर्ण करणार आहे. नगरसेवकाचा कालावधी संपण्यापूर्वी हा प्रश्न मार्गी लावणार.- सुनीता राऊत, नगरसेवक.
शिवाजी पेठेने किती दिवस ‘धुरळा’ खायचा?
By admin | Published: February 06, 2015 12:58 AM