कोल्हापूर : साहेब आम्ही पूरग्रस्त म्हणून किती दिवस जगायचे, आमच्याकडे कधी लक्ष देणार? आम्हाचे पुनर्वसन कधी होणार? असे प्रश्न सुतारवाड्यातील पूरबाधित महिलांनी शुक्रवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना विचारला. यावर पालकमंत्री मुश्रीफ यांनी पूर आल्यानंतरच तुम्ही आम्हाला विचारता? इतरवेळी पाठपुरावा करा, वारंवार विचारणा करा, असे उत्तर देऊन निघून गेले.पालकमंत्री मुश्रीफ यांनी चित्रदुर्ग मठातील स्थलांतरित पूरग्रस्तांची भेट घेऊन जाताना सुतारवाड्यातील महिलांना अशी विचारणा केली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.मंत्री मुश्रीफ यांनी शहरातील विविध ठिकाणच्या पूरग्रस्त परिसराची पाहणी केली. चित्रदुर्ग मठातील स्थलांरित पूरग्रस्तांची पाहणी केली. यावेळी प्रशासन के. मंजुलक्ष्मी यांच्याकडून पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या सेवासुविधांची माहिती घेतली.यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, काल रात्री खूप पाऊस झाला. ज्या-ज्या वेळी कमी दाबाचा पट्टा तयार होतो. खूप पाऊस पडतो. यावेळीही अशीच स्थिती निर्माण झाली. जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे पूर आला; पण मी आज पांडुरंगाला साकडे घातले आहे. सगळे व्यवस्थित होईल. पुण्याची पुराची घटना वेगळी आणि कोल्हापूरची घटना वेगळी आहे. आमच्यात जरूर मतभेद आहेत. महापालिका, जिल्हा प्रशासन यांच्यात चांगला समन्वय आहे. परिणामी प्रशासन अलर्ट मोडवर आहे. कर्नाटकातील आलमट्टीतून अधिकाधिक विसर्ग होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हिप्परगी धरणातूनही विसर्ग वाढवण्याच्या सूचना दिल्या जातील. येथून एका अधिकाऱ्यास तिकडे पाठवून विसर्गाची नेमकी माहिती घेऊ.
महायुतीचे सरकार येईल..पाच वर्षे कोणालाही थांबायची इच्छा नाही. सध्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी दोन, शिवसेना दोनसह आठ पक्ष आहेत. त्यामुळे इच्छुक वाढले आहेत. विधानसभेला बहुरंगी लढत होईल. यामधून महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास पालकमंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.