लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : कलानगर-चंदूर मार्गावरील पुलाचे काम गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. तसेच याठिकाणी तयार केलेला पर्यायी मार्गही निकृष्ट दर्जाचा आहे. थोडा पाऊस झाला तरी तो लगेचच पाण्याखाली जातो आणि नागरिक, कामगार, शाळकरी मुले-मुली यांना त्यातूनच जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागते. याबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी बातम्या देऊन यावर आवाज उठविला. एखाद्याचा जीव गेल्यावरच याकडे पाहणार का, असा सवालही ‘लोकमत’ने उपस्थित केला होता; पण निर्ढावलेले प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे एकाचा जीव गेला. या घटनेचे तरी गांभीर्य पाहून प्रशासन व लोकप्रतिनिधी जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
कलानगर-चंदूर ओढ्यावरील पूल हा वक्रस्थितीत आहे. प्रकाश आवाडे आमदार असताना तो सरळ चिंधी पीर ते सायझिंग, असा थेट मंजूर करण्यात आला होता. त्याला त्या परिसरातील काहीजणांनी विरोध केल्यामुळे ते काम थांबवून पुन्हा आहे त्याच ठिकाणी बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. परत पाठविलेला फेर प्रस्ताव सुरेश हाळवणकर आमदार झाल्यानंतर मंजूर झाला आणि प्रत्यक्षात कामकाजास सुरुवातही झाली; पण पुलाची उंची थेट पुलाच्या हिशोबानेच मंजूर राहिल्याने पुन्हा तोच प्रश्न उपस्थित झाला आणि परिसरातील काहीजणांनी त्याला विरोध दर्शविला. त्यामुळे परत पुलाचे काम थांबले.
गेल्या दहा वर्षांपासून मागणी असलेल्या या पुलाचे काम दोनवेळा मंजूर होऊन ते परत जाऊन त्यामध्ये फेरबदल करण्यात आले. स्थानिक विरोध पाहता पुन्हा प्रशासकीय पातळीवर अनेक उलथापालथी होऊन पुलाची उंची कमी करण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे उंच उभे केलेले पुलाचे सिमेंटचे खांब मशीन लावून अर्ध्यातून कापण्यात आले आणि पावसाळा सुरू झाल्याचे कारण पुढे करीत पुन्हा थांबले. ग्रामस्थांच्या मते या पुलाच्या प्रकरणात राजकारण घुसल्याने विनाकारण सर्वांनाच त्रास होत असल्याचे बोलले जात आहे. राजकारणाच्या वादातून थांबलेल्या कामामुळे सर्वसामान्याला बळी पडावे लागले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. या दुर्दैवी घटनेला जबाबदार धरायचे कोणाला?यश कधी मिळणार ?रात्रीच्या वेळी पुलावरून जाताना दिवाबत्तीची सोय नसल्याने पाण्याचा अंदाज आला नाही आणि प्रकाश वासुदेव यांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. या कुटुंबीयांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी नातेवाइक व परिसरातील ग्रामस्थांनी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्याकडे केली; पण त्याला यश कधी मिळणार, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.