लोकमत न्यूज नेटवर्क
गडहिंग्लज : गोकुळ दूध संघात सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेली लूट आपण उघड्या डोळ्यांनी किती दिवस बघत बसायची? असा उद्विग्न प्रश्न करतानाच दूध उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबविण्यासाठीच ‘गोकुळ’मध्ये परिवर्तन घडवा, असे आवाहन ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (रविवारी) केले.
राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या प्रचारार्थ येथील सूर्या सांस्कृतिक हॉलमध्ये आयोजित गडहिंग्लज तालुक्यातील ठरावधारकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुश्रीफ म्हणाले, थ्रू पास टँकर, मुंबईतील दुधाचे कमिशन, लोण्याचे कमिशन, पशुखाद्यासाठी घेत असलेले चढ्या दराचे मोलॅसीस, नोकर भरतीचा बाजार याबाबत सत्ताधारी बोलायलाच तयार नाहीत. परंतु, आम्ही पारदर्शी कारभारातून दुधाला लीटरला २/४ रुपये जादा दर देवूच. तसेच दिवाळी बोनसच्या माध्यमातून माता-भगिनींना सोन्याने मढवल्याशिवाय राहणार नाही.
पालकमंत्री पाटील म्हणाले, महादेवराव महाडिक यांच्या दूध वाहतुकीच्या टँकरची बिले चौथ्या-पाचव्या दिवशीच काढली जातात. मग दूध उत्पादकांना ३, १३ आणि २३ तारखेला दुधाची बिले देत असल्याची टिमकी का वाजवता?
यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, अरूण डोंगळे, तानाजी शेंडगे, सोमगोंडा आरबोळे, रघुनाथ पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
या मेळाव्याला आमदार प्रकाश आबीटकर, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, गोपाळराव पाटील, रामाप्पा करिगार उपस्थित होते. अमर चव्हाण यांनी स्वागत केले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी प्रास्ताविक केले. जयसिंग चव्हाण व राजेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर शिवप्रसाद तेली यांनी आभार मानले.
-------------------------
* श्रीपतराव शिंदे यांचा पाठिंबा !
मंत्री मुश्रीफ, विश्वास पाटील यांच्यासह आपण श्रीपतराव शिंदे यांची भेट घेऊन पाठिंब्याची विनंती केली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या आघाडीला पाठिंबा देत असल्याचे फोनवरून सांगितल्याचे पालकमंत्री पाटील यांनी आपल्या भाषणात जाहीर केले.
-----
* त्यांनी माझ्याविषयी बोलू नये
स्व. कुपेकरांचे बोट धरून राजकारणात आलेल्यांनी माझ्याविषयी बोलताना भान ठेवून बोलावे, असा सल्ला माजी आमदार संध्यादेवी कुपेकरांनी विरोधकांना दिला.
-------------------------
* बॅकलॉग भरून काढू ‘गोकुळ’चे इच्छुक उमेदवार सतीश पाटील व सोमगोंडा आरबोळे यांनी आपल्यावर अन्याय झाल्याचे यावेळी सांगितले. त्यासंदर्भात बोलताना मुश्रीफ म्हणाले, पाटलांना भरपूर मिळाले आहे. यापुढेही त्यांच्या नशिबात असेल ते त्यांना मिळेलच, आरबोळेंचा बॅकलॉगही भरून काढला जाईल. परंतु, दोघांनी आघाडीच्या विजयासाठी एकदिलाने काम करावे.
-------------------------
* तर निवडणूक लढवणार नाही
गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील ठरावधारकांची संख्या विचारात घेता, किमान ६ जागा मिळायला हव्या होत्या. पुढच्यावेळी सहा जागा मिळाल्या नाहीत तर आपण विधानसभेची निवडणूक लढवणार नाही. त्यामुळे गडहिंग्लज विभागातील ठरावधारकांनी यावेळी आपली ताकद दाखवावी, अशी भावनिक आवाहन आमदार राजेश पाटील यांनी केले.
-------------------------
* फोटो ओळी : गडहिंग्लज येथील मेळाव्यात ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विश्वास पाटील, सतेज पाटील, संजय मंडलिक, संध्यादेवी कुपेकर, विजय देवणे, आदी उपस्थित होते.
क्रमांक : २५०४२०२१-गड-०५