कोल्हापूर : मूळच्या प्रश्नाला बगल देण्यापेक्षा हिंमत असेल तर कदमवाडीच्या स्मशानभूमीसमोरील ‘त्या’ माळावर या. ७५ लाखांची मागणी करणारे नागरिक, तुम्ही आणि मी सर्वांसमक्ष चर्चा घडवूया. त्यानंतरच कोणाच्या डोक्यावर परिणाम झाला; आणि कोणाला उपचाराची गरज आहे, हे कोल्हापूरच्या जनतेलाही समजेल, असे आव्हान ज्येष्ठ नगरसेवक सत्यजित कदम यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना पत्रकार परिषदेत दिले. एकेकाळी स्कूटरवरून फिरणाºया आमदार क्षीरसागर यांच्याकडे १ कोटी १० लाखांची मर्सिडीस गाडी कशी आली, अशी खोचक विचारणाही कदम यांनी यावेळी केली.
क्षीरसागर यांनी कदमवाडी परिसरातील रि.स.नंबर २१६ मध्ये ७५ लाख रुपये आमदार निधी खर्च केला व त्यानंतर या रकमेतून केलेला रस्ता मूळ मालकाने उखडून टाकला. त्यामुळे हा निधी आमदार क्षीरसागर यांनी विकल्याची तक्रार कदम यांनी गेल्या महिन्यांत केली होती. त्यावरून मूळ हा वाद सुरू झाला व तो आता चांगलाच भडकण्याची चिन्हे आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील राजकारणही त्याच्या मुळाशी आहे.
कदम म्हणाले, ‘आमदार क्षीरसागर यांनी आरोपांचा खुलासा करण्यापेक्षा मूळच्या विषयाला बगल दिली. त्यांनी हिंमत असेल तर निधी मागणारे नागरिक, तुम्ही आणि मी सर्वजण कदमवाडीच्या स्मशानभूमीसमोरील ‘त्या’ रस्ता केलेल्या जागेत यावे. तिथेच सर्वांसमक्ष चर्चा करू. नागरिक म्हणून तुम्हाला जाब विचारण्याचा अधिकार आहे.
अबु्रनुकसानीचा दावा करताना पाच लाख रुपये रोख कुठून आणले, तेही त्यांनी तिथे सांगावे.’ ते म्हणाले, आमदारांनी शहरातील डॉक्टरांकडे खंडणी मागून योजना बंद पाडल्याने रुग्णांना उपचारासाठी मुंबईला जावे लागते. त्यांच्या स्वीय सहायकानेही खंडणी मागितल्याबद्दल डॉक्टराने त्यांच्यावर पोलिसांत तक्रार दिल्याचे प्रकरण जगजाहीर आहे. मी कॉन्ट्रॅक्टर, उद्योजक आहे. माझी शेती असल्याने मी पूर्वापार सधन आहे. २० लाखांच्या टर्फचे काम ६३ लाखांत करून क्षीरसागर यांनी फुटबॉलप्रेमींची फसवणूक केली आहे. या कामांसह ओपन जीमच्या कामाची वर्कआॅर्डर आपल्या मुलाच्या नावावर काढल्याचाही लवकरच पर्दाफाश करणार आहे. माझ्या प्रश्नांना उत्तर देणार नाही म्हणता, हा पळपुटेपणा का करता? असाही प्रश्न केला. या पत्रकार परिषदेस, सुनील कदम, आशिष ढवळे आदी उपस्थित होते.शाही विवाहासाठी पैसा आणला कोठून..?निवडणुकीपूर्वी स्कूटरवरून फिरणारे आमदार; यांचा व्यवसाय काय? त्यांच्याकडे पैसा आला कोठून? असे प्रश्न सत्यजित कदम यांनी विचारले. आमदारांनी आपल्या मुलाच्या शाही विवाहासाठी पैसा आणला कोठून? शनिवार पेठेतील अपार्टमेंटमध्ये त्यांचे फ्लॅट किती? पन्हाळ्यावर जमीन खरेदीसाठी त्यांच्याकडे पैसा आला कोठून? ते फिरत असलेली १
कोटीची मर्सिडीस आली कोठून?सध्या त्यांच्याकडे सात-आठ आलिशान कार आहेत. ते पैसे आले कोठून? असे अनेक प्रश्न उपस्थित केले.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पन्हाळा कार्यालयात तर त्यांनी उच्छाद मांडला. तेथील अधिकाºयांनी कंटाळून केबीनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असल्याचे कदम यांनी यावेळी सांगितले.