कोल्हापूर : महाविकास आघाडीचे सरकार असताना तुम्ही अडीचवर्षे कोल्हापूरचे पालकमंत्री होता. त्यावेळी तुम्ही विरोधकांना जिल्हा नियोजनमधील किती निधी दिला असे प्रत्यूत्तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार सतेज पाटील यांना सोमवारी दिले. नियोजनचा सर्व निधी सत्तारुढ गटाच्याच आमदारांना द्यायचे असेल तर याचे नाव बदलून सत्तारुढ निधी वितरण समिती ठेवले पाहीजे असा आरोप आमदार पाटील यांनी केला होता.कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनता दरबारनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा नियाेजन समितीमधील निधी वाटपावरून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता टिका केली होती. कोल्हापुरात विरोधी पक्षाचे ६ आमदार असताना फक्त १० टक्के निधी देणे ही नागरिकांची फसवणूक आहे असे म्हटले होते. यावर पालकमंत्री मुश्रीफ यांनी सतेज पाटलांना तुम्ही अडीचवर्षे पालकमंत्री असताना विरोधकांना किती निधी दिला होता अशी विचारणा केली.मार्चमध्ये कामे सुरू होणारजिल्हा नियोजन समितीचा निधी दोन महिन्यात संपणार का? या प्रश्नावर ते म्हणाले, नियाेजनचा शंभर टक्के निधी खर्च होईल. ८ तारखेला समितीची बैठक आहे. आलेल्या प्रस्तावांना जानेवारीमध्ये प्रशासकीय मान्यता दिली जाईल. फेब्रुवारीमध्ये निविदा व वर्कऑर्डर दिले जातील. मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागण्यापूर्वी कामे सुरू झालेली असतील.आमच्याकडेही लक्ष द्या..नववर्षाच्या नागरिकांना शुभेच्छा देताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, नागरिकांना हे वर्ष चांगले, आरोग्य व समृद्धीचे जावो. हे निवडणुकीचे वर्ष आहे. लोकसभा, विधानसभा त्यानंतर सहकार अशा विविध निवडणूका होणार असल्याने हे वर्ष ऐतिहासिक असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आमच्याकडेही लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
..तेव्हा विरोधकांना किती निधी दिला, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे सतेज पाटील यांना प्रत्यूत्तर
By इंदुमती सूर्यवंशी | Published: January 01, 2024 6:21 PM