भारत चव्हाण ।कोल्हापूर : महापालिकेत कोणीही यावे आणि अधिकाºयांना शिव्या घालाव्यात, कर्मचाºयांना मारहाण करावी, त्यांची मानहानी करावी, असा जणू काही शिरस्ताच पडलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून वारंवार घडणाºया, अशा घटनांतून साचून राहिलेल्या संतापाचा उद्रेक म्हणजे शुक्रवारी ‘एमआयएम’च्या कार्यकर्त्याला झालेली मारहाण आहे. ही घटना तशी अनपेक्षित नसून, कधी ना कधी हा उद्रेक होणारच होता, तो शुक्रवारी झाला.
महानगरपालिकेत रोज एका कर्मचा-यास किंवा अधिका-यास जाहीरपणे अपमानित व्हावे लागत आहे. शिवीगाळ, धमक्या, अपमानास्पद बोलणे, इत्यादी गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. उपशहर अभियंता एकाच प्रकरणात महिनाभर त्रास सहन करीत होते. महापालिकेच्या सभागृहात, स्थायी समिती सभेत नगरसेवक, पदाधिकारी वाट्टेल तशा भाषेत अधिका-यांचा उद्धार करीत असतात. पदाधिकारी, नगरसेवकांना उलटे बोलले तर ‘आपणाला नोकरी करायची आहे, त्रास होईल’ या भीतीपोटी निमूटपणे सहन करून घेतात. वाद घालत न बसता झाले गेले विसरून जातात; परंतु ही मुस्कटदाबी नेहमीचीच झाली आहे. वरिष्ठ अधिकारी यात हस्तक्षेप करीत नाहीत.काही ‘आरटीआय’ कार्यकर्ते केवळ भीती घालून अधिकाºयांकडून कामे करून घेत आहेत. एखाद्या कामाची माहिती मागवायची, ती वृत्तपत्रांना देतो असे सांगायचे आणि आपले हेतू साध्य करून घ्यायचा प्रयत्न काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. कोणतेच काम शंभर टक्के स्वच्छ व निर्वेध असत नाही. त्यात काही तरी उणीव राहिलेलीच असते. हे माहीत असल्यामुळे अधिकारी घाबरतात. एखाद्या अधिकाºयाने काम केले नाही की, मग कायद्याचा किस पाडून त्यातील त्रुटी शोधल्या जातात व त्यावर बोट ठेवून अधिकाºयांना जाब विचारला जातो. घाबरवले जाते.
‘एमआयएम’चा कार्यकर्ता शाहिद शेख हाही त्याच पठडीतील कार्यकर्ता आहे. तो उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्याकडे गेल्या महिन्याभरापासून कायद्यात न बसणारे काम करण्याचा आग्रह धरीत होता. काम करण्यास ठामपणे नकार देताच त्यांना शिवीगाळ, मारहाण, धमक्या दिल्या. तसा गुन्हा आता नोंद झाला आहे. त्यामुळे किती अपमानित व्हायचे, असा सवाल महापालिका वर्तुळात उपस्थित केला जात आहे.‘त्या’ कार्यकर्त्याची अधिका-यांना नेहमी दमबाजीआयुक्तांशी जवळीक असलेला एक सामाजिक कार्यकर्ता तर आपली कामे झाली नाहीत की अधिकाºयांना दमबाजी करीत असे. अधिकाºयांच्या विरोधात कान भरून आयुक्तांकडून एका अधिकाºयाची बदलीही त्याने केली होती. या कार्यकर्त्यांचे ‘बोल खावे तर अडचण, आयुक्तांना सांगावे तरीही अडचण’ अशी कोंडी अधिकाºयांची झाली होती. एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याच अधिकाºयास काम करीत नाही म्हणून लक्ष्य बनविले होते. उपनगरातील एक नगरसेवक व त्याच्या भावाने दोनवेळा कर्मचाºयांना मारहाण केली होती.
- वरिष्ठ अधिकारी, युनियनचे दुर्लक्ष
अशा घटना घडत असताना आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त दर्जाचे अधिकारी, तसेच कर्मचारी संघाचे पदाधिकारी दुर्लक्ष करतात. एखादी घटना घडली आणि ती आयुक्तांच्या कानावर घालायला कोणी गेलाच, तर त्याला पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करा, असा उपदेश केला जातो. युनियनकडे गेला तर आधी आमच्याकडे तक्रार द्या, अशी मागणी केली जाते. युनियन तर समोरचा माणूस कोण आहे, हे पाहूनच अधिकारी, कर्मचाऱ्याच्या पाठीशी राहायचे की नाही हे ठरविते. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी अक्षरश: हवालदिल झाले आहेत.