संदीप आडनाईककोल्हापूर : आपले शरीर हे ६५ ते ७० टक्के पाण्याने भरलेले आहे. रोज रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत आपण झोपेच्या स्वाधीन असतो. तेव्हा या काळात पाणी शरीरात जात नाही; मात्र तुम्ही दिवसाला किती प्रमाणात पाणी प्यावे, हे तुमच्या वजनावर अवलंबून असते. उन्हाळा आहे, म्हणून जास्तीचे पाणी पिणेदेखील अपायकारक ठरू शकते.प्रथम तुमचे वजन मोजा. एकदा शरीराचं वजन (किलोग्रॅममध्ये) तपासलं गेल्यानंतर त्या संख्येला ०.६ ने भागा. येणारी संख्या ही रोज किती लीटर पाणी प्यायला हवं याची गणना आहे. समजा वजन ७० किलो असेल तर ते ०.६ ने भागाकार केल्यास ४२ ही संख्या मिळेल. म्हणजेच, या वजनाच्या व्यक्तीने रोज ४ लीटर २०० मिली पाणी प्यावे.
कमी पाणी प्यायल्याने काय होते?पाणी कमी पिण्यामुळे वाढत्या वयाच्या खुणा लवकर दिसू लागतात. सुरकुत्या लवकर येतात. त्वचेची चमक निघून जाते आणि ती सैल पडू लागते. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर मेटाबॉलिजमची प्रक्रिया नीट होत नाही आणि शरीरात फॅट जमण्यास सुरुवात होते.जास्त पाणी प्यायल्याने काय होते?जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सचे संतुलन बिघडू शकते. तसेच यामुळे रक्तातील सोडियमचे प्रमाण कमी होऊ शकते. यामुळे हायपोनेट्रेमिया ही स्थिती उद्भवू शकते. यामध्ये अस्वस्थ वाटणे, डोकेदुखी, चिडचिड होणे ही लक्षणं दिसून येतात.
पाणीदार फळेदेखील आवश्यकउन्हाळ्यात कलिंगड, द्राक्षे, लिंबू, मोसंबी, संत्री, टरबूज, शहाळी, जांभूळ, किवी यासारखी पाणीदार फळे खावीत. कलिंगडामध्ये ९० टक्के पाणी असते. शिवाय पोटातील टॉक्झिक युरिनवाटे बाहेर पडण्यास मदत होते, त्वचा तजेलदार राहते. टरबूजाचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढते. रक्तदाब नियंत्रण आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी ते फायदेशीर ठरतं.द्राक्षांमध्येही पोटॅशिअम आणि अँटीऑक्सिडंट असतात. शरीर हायड्रेट राहते, तसेच रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, हृदयविकारांसारख्या समस्यांवर आराम मिळतो. मेंदूला योग्य रक्तपुरवठा करण्याचे कामही द्राक्षं करतात. शहाळ्यातील पोटॅशिअममुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.
वयोगट दिवसाला किती लिटर?
- ० ते ६ महिने : ४०० मिली
- ७ महिने ते १ वर्ष : ६०० मिली
- १ ते ३ वर्षे : ७३८ मिली
- ३ ते ८ वर्षे : १ लीटर १२२ मिली
- ८ ते १३ वर्षे : १ लीटर ९३२ मिली
- १३ ते १८ वर्षे : ३ लीटर ७३२ मिली
- १८ पेक्षा जास्त : ५ लीटर ४०० मिली
सामान्यत: ज्यांच्या हृदयाचे पंपिंग फंक्शन सामान्य म्हणजे ६० टक्के असते आणि लघवीही सामान्य असते, त्यांनी चार लीटर पाणी प्यायले पाहिजे. इतरांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार वजनानुसार पाणी घ्यावे. जे खाल ते पचण्यासाठी आणि मिश्रण होण्यासाठी पाणी गरजेचे आहे. -डॉ. अक्षय बाफना, हृदयरोगतज्ज्ञ, सीपीआर, कोल्हापूर.पाणी किती महत्त्वाचे आहे ते आपल्या सर्वांना समजले असेलच. त्यामुळे दररोज भरपूर पाणी प्या व निरोगी आयुष्य जगा. -डॉ. उमेश कदम, वैद्यकीय अधीक्षक, कसबा बावडा, सेवा रुग्णालय.