कोल्हापूर : ‘तुझ्यासारखीने आरशात बघावे कशाला, सुचेना जगावे कसे आरशाला़़ .’, ‘कर्ज आमची जात, जमिनीवरील कर्जाला आमच्या स्वर्गातून जामीन’, ‘दगड माझा मला वाटतो...’, ‘एक रूपेरी केस...’ अशा एकापेक्षा एक बहारदार कवितांची मुक्त उधळण विद्यापीठाच्या भाषा भवनाममध्ये काव्यरसिकांनी अनुभवली़ निमित्त होते मराठी भाषा गौरवदिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाचा मराठी विभाग आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा यांच्यातर्फे शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलनाचे़़़डॉ़ चंद्रकांत पोतदार यांचे खुमासदार सूत्रसंचालन आणि प्रेम, विरह आणि व्यसन या विषयांवर मार्मिक टिप्पणी करणाऱ्या कवितांमुळे ही काव्यमैफल उत्तरोत्तर रंगत गेली़ कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंद पाटील यांच्या आरशात पाहणाऱ्या सुंदर तरुणींवर टिपण्णी करणाऱ्या ‘तुझ्यासारखीने बघावे कशाला, सुचेना जगावे कसे आरशाला.’ आणि विष्णू पावलेंच्या ‘उनाड’ या कवितांमुळे हास्याचे कारंजे उडाले़ नीलांबरी कुलकर्णी यांनी ‘तुझ्याचसाठी तुझ्याबरोबर...’, सुप्रिया वकील यांनी ‘एक केस रूपेरी..’ या कविता सादर केल्या़ श्रीकृष्ण महाजन यांनी सांस्कृतिक चाकोरीवर भाष्य करणारी ‘दगड मला माझा वाटतो’ तर गोविंद पाटील यांच्या व्यसनावर आधारित ‘रोज एक खंबा पाहिजे’ कवितेला उत्स्फूर्त दाद मिळाली़ विनोदी कवितांबरोबरच सामाजिक प्रश्नावर प्रकाश टाकणाऱ्या कविताही सादर करण्यात आल्या़ भीमराव धुळूबुळू यांनी कवितेचा शोध या विषयावर ‘इंद्रायणीही आता दुथडी भरून वाहत नाही...’, ही कविता सादर केली़ रवींद्र ठाकूर यांनी ‘आज कोजागिरी आहे...’ डॉ़ चंद्रकांत पोतदार यांनी ऊसतोडणी मजुरांची परिस्थिती मांडणारी ‘फडाचा संसार...’ ही कविता सादर केली़ यावेळी विनोद कांबळे, दयानंद भांडवले, रघु कदम, रमेश कुलकर्णी आदींनीही कविता सादर केल्या़ मराठी विभागप्रमुख डॉ़ कृष्णा किरवले यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)
सुचेना जगावे कसे आरशाला़
By admin | Published: March 01, 2015 10:33 PM