राम मगदूम
गडहिंग्लज : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांची काळजी कशी घ्यायची याचीच चिंता प्रशासनासह पालकांनाही लागली आहे. गडहिंग्लज तालुक्यात १८ वर्षांखालील मुलांची संख्या ५४ हजार ९३३ इतकी आहे; परंतु शहरासह तालुक्यात मिळून बालरोगतज्ज्ञ केवळ आठच आहेत. त्यामुळे अद्याप दुसरी लाट सरली नसतानाच तिसऱ्या लाटेतील संभाव्य धोक्याच्या छायेखाली असणाऱ्या १८ वर्षांखालील मुलांच्या चिंतेने सारेच हैराण झाले आहेत.
येत्या ऑगस्टमध्ये तिसरी लाट येई,ल असे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. या लाटेत १८ वर्षांखालील मुलांना अधिक धोका असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. म्हणूनच या लाटेचा मुकाबला कसा करायचा? याचीच चिंता संबंधितांना लागली आहे.
गडहिंग्लज शहरासह तालुक्यात मिळून १८ वर्षांखालील मुलांची संख्या ५४ हजार ९३३ इतकी आहे. त्यात ६ वर्षांखालील मुलांची संख्या १३ हजार १२५ इतकी आहे; परंतु दुसऱ्या लाटेतील ऑक्सिजन बेडची कमतरता, ऑक्सिजनचा तुटवडा, व्हेंटिलेटरची वानवा यामुळे तालुक्यातील मृत्युदर वाढला आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत मुलांचे काय होणार ? हीच चिंता सर्वांना भेडसावत आहे.
गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात तीन, तर प्राथमिक आरोग्य केंद्रात एक मिळून केवळ ४ बालरोगतज्ज्ञ शासकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेत खासगी बालरोगतज्ज्ञांवरच भार पडणार आहे. त्यामुळे संभाव्य धोका विचारात घेऊन मुलांवरील उपचाराचे नियोजन करण्याची गरज आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासनाने याप्रश्नी विशेष लक्ष घालावे आणि मुलांच्या उपचाराचे स्वतंत्र नियोजन करावे, अशी जनतेची मागणी आहे.
----------------------
* व्याधीग्रस्त मुलांची काळजी
व्याधीग्रस्तांना कोरोनाचा धोका अधिक आहे; परंतु गतवर्षी अचानक आलेल्या पहिल्या लाटेमुळे गडहिंग्लज तालुक्यातील केवळ ८ वी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचीच आरोग्य तपासणी झाली. त्यात २० मुले व्याधीग्रस्त आढळून आली आहेत. पहिली ते सातवीच्या मुलांची आरोग्य तपासणी झालेलीच नाही. त्यामुळे व्याधीग्रस्त मुलांची संख्या वाढण्याची शक्यता असून त्यांचीच काळजी शिक्षक व पालकांना सतावते आहे.
------------------
* प्रतिक्रिया
संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका विचारात घेता १८ वर्षांखालील मुलांच्या उपचाराची स्वतंत्र व्यवस्था करण्यात गरज आहे. त्यादृष्टीने लवकरच शासकीय व खासगी सेवेतील बालरोगतज्ज्ञांची संयुक्त बैठक घेत आहे. त्यात मुलांवरील उपचाराचा कृती आराखडा तयार करून मुलांसाठी स्वतंत्र बेडचे नियोजन करण्यात येईल.
- दिनेश पारगे, तहसीलदार, गडहिंग्लज.
------------------
* गडहिंग्लज तालुक्यातील मुलांची संख्या अशी :
* १८ वर्षांवरील : ५४ हजार ९३३
* ६ वर्षांवरील : १३ हजार १२५
-------------------------
* बालरोगतज्ज्ञांची संख्या अशी
- शासकीय सेवेतील डॉक्टर : ४
- खासगी सेवेतील डॉक्टर : ८