कोल्हापूर : ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठीची साधने आहेत, तेथे नेटवर्क उपलब्धतेची अडचण आहे. विशेषत: ती ग्रामीण भागात अधिक जाणवत आहेत. वारंवार नेटवर्क खंडित होण्याने विद्यार्थ्यांचे शिक्षणात एकाग्रता राहत नाही. साधने नसणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविताच येत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचे, तरी कसे? असा प्रश्न कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांसमोर आहे. एकूणच स्थिती पाहता ऑनलाईन शिक्षण निव्वळ औपचारिकता असल्याचे दिसत आहे.
कोरोनामुळे आर्थिक स्थिती बिघडलेली असली, तरी आपल्या मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, त्याची अभ्यासाची सवय कायम राहावी, यासाठी पालकांनी १० ते १५ हजार रुपये खर्चून मुलांना स्मार्टफोन उपलब्ध करून दिले आहेत. स्मार्टफोन असले, तरी नेटवर्क उपलब्धता आणि ऑनलाईन शिक्षणाचे विद्यार्थ्यांना आवश्यक त्या प्रमाणात आकलन होत नसल्याची पालकांची तक्रार आहे. ऑनलाईन वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती असते, मात्र १५ ते २० मिनिटांनंतर त्यांची एकाग्रता राहत नाही. वर्ग संपेपर्यंत साधारणत: ४५ टक्के विद्यार्थी उपस्थित असतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात शिक्षकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे शिक्षण पोहोचविण्यासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन करून ऑफलाईन स्वरूपात वर्ग भरविण्याचा एकमेव पर्याय आहे. (उत्तरार्ध)
शिक्षक काय म्हणतात?
नेटवर्कबरोबर स्मार्टफोन नसणे, घरी असलेला एकच फोन वेळेत उपलब्ध न होणे, या तांत्रिक अडचणींचा आम्हाला ऑनलाईन शिक्षण देताना सामना करावा लागत आहे. राज्य शासनाने शाळांना इंटरनेट सुविधा दिलेली नाही. त्यामुळे बहुतांश शिक्षक हे पदरमोड करून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देत आहेत. त्याचा आणि विद्यार्थ्यांच्या अडचणीचा शासनाने गांभीर्याने विचार करावा.
-संतोष आयरे, राज्य कार्याध्यक्ष, खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर महासंघ
स्मार्टफोन, इंटरनेट नसल्याने अनेक मुलांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. त्यात अधिकत्तर ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि मुलींचे प्रमाण आहे. ऑनलाईन पद्धतीने अध्यापन आणि अध्ययन हे समाधानकारक होत नाही. एकूणच पाहता ऑनलाईन पद्धतीमुळे सध्याच्या स्थितीत सार्वजनिक शिक्षण हे निव्वळ औपचारिकता बनले आहे.
-राजेश वरक, विभागीय उपाध्यक्ष, शिक्षक लोकशाही आघाडी
चौकट
कोरोना ड्यूटीमुळे नियोजन कोलमडले
गेल्या चार महिन्यांपासून प्राथमिक, माध्यमिक शिक्षक हे कोरोना ड्यूटी करत आहेत. त्यातील काहीजण ही ड्यूटी सांभाळून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झाला नसल्याने त्याची कोरोना ड्यूटी सुरूच आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण आणि ब्रीज कोर्सचे नियोजन कोलमडले आहे.