कोल्हापूर : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राजकीय आकसापोटी ‘ईडी’कडे तक्रार केली असून त्यांची संपूर्ण कारवाई ही मला टार्गेट करण्यासाठीच आहे. ‘ईडी’ने उपस्थित केलेल्या मुद्यावर पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल झालेली आहे, यावर मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असताना पुन्हा ईडी कारवाई कशी करू शकते? अशी पुनर्याचिका आ. हसन मुश्रीफ यांच्या वतीने सोमवारी ॲड. प्रशांत पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर आज, मंगळवारी सुनावणी होणार असल्याचे समजते.संताजी घोरपडे साखर कारखाना, ब्रिक्स कंपनी व जिल्हा बँकेच्या कारभारावर ‘ईडी’ने आक्षेप नोंदवला आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी ईडीच्या पथकाने हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी छापा टाकला होता. यामध्ये त्यांनी फारशी तपासणी केली नव्हती, मुश्रीफ यांना समन्स बजावण्यासाठीच ते आल्याचे समजते. मात्र, ते उपलब्ध होऊ शकले नसल्याने त्यांनी समन्स बजावून सोमवारी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले.मात्र, मुश्रीफ यांनी ईडी कार्यालयात हजर न राहता, वकिलांमार्फत म्हणणे सादर केले. म्हणणे मांडण्यासाठी एक महिन्याचा कालावधी त्यांनी मागितला आहे.दरम्यान, आपण कागल मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलो आहे, त्यामुळे ‘ईडी’ची कारवाई ही संपूर्ण राजकीय आकसापोटी केली आहे. ‘ईडी’ने उपस्थित केलेल्या मुद्द्यावरच पुणे पोलिसात तक्रार दाखल झाली होती. त्यावर १ एप्रिल २०२२ ला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असताना पुन्हा त्याच मुद्द्याच्या आधारे ‘ईडी’ कारवाई कशी करू शकते?न्यायालयाच्या आदेशाचे ‘ईडी’ पालन करत नसून त्यांना मला अटकच करायची आहे, त्यामुळेच समन्स बजावली आहे. अशा आशयाची पुनर्याचिका मुश्रीफ यांच्या वतीने ॲड. पाटील यांनी सोमवारी दाखल केली आहे.
पुन्हा कारवाई कशी?, ‘ईडी’विरोधात हसन मुश्रीफ हायकोर्टात; आज सुनावणी शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 11:57 AM