कोल्हापूर : देवर्डे (ता. आजरा) येथील शेतकरी कुटुंबातील लक्ष्मण महादेव कसेकर याने सहायक वनसंरक्षकपदाच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकविला. अहमदनगरमधील रामदास विष्णू दौंड हे मागासवर्गीय प्रवर्गातून, तर महिला वर्गवारीमधून लातूर येथील प्रतिक्षा नानासाहेब काळे यांनी प्रथम क्रमांकाने यश मिळविले.
राज्य लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेचा निकाल शुक्रवारी आॅनलाईन जाहीर झाला.एमपीएससीकडून सहायक वनसंरक्षक (गट-अ) १६ आणि वनक्षेत्रपाल (गट-ब) ५३ पदांसाठी दि. २८ आॅक्टोबर २०१८ रोजी परीक्षा घेण्यात आली. त्याचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. देवर्डे येथील विद्यामंदिरमध्ये त्याचे प्राथमिक शिक्षण झाले. आजरा महाविद्यालयामधून बी. एस्सी. (स्टॅटेस्टिक) अभ्यासक्रमाची पदवी घेतल्यानंतर लक्ष्मण याने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. सहायक वनसंरक्षकपदासाठी गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या लेखी परीक्षेत त्याने यश मिळविले. मात्र, मुलाखतीसाठी तो पात्र ठरला नाही. त्यावर पुन्हा जोमाने तयारी सुरू केली. त्याच्या जोरावर या परीक्षेत ४५० पैकी २८२ गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक पटकविला. मार्चमध्ये त्याने सहायक कक्ष अधिकारी पदाच्या परीक्षेत राज्यात चौथा क्रमांक मिळविला होता. लक्ष्मण हा सध्या कोल्हापुरातील प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरमध्ये युपीएससीची तयारी करीत आहे. त्याचे वडील लक्ष्मण आणि आई शोभा या शेती करतात. त्याला ए. बी. फौंडेशनचे दीपक अतिग्रे, ज्ञानदेव भोपळे यांचे मार्गदर्शन लाभले.‘युपीएससी’ तील यशाचे ध्येयसहायक वनसंरक्षक परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याचा खूप आनंद होत आहे. या पदावर रूजू होणार आहे. माझ्या यशात कुटुंबाचा मोठा वाटा असल्याची प्रतिक्रिया लक्ष्मण याने व्यक्त केली. मोठा भाऊ रामचंद्र यांच्या मार्गदर्शनानुसार स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. स्वत: काढलेल्या नोटस्वर भर देत अभ्यास केला. मुलाखतीच्या तयारीसाठी ए. बी. फौंडेशनचे मार्गदर्शन लाभले. सध्या उपजिल्हाधिकारी पदासाठीच्या परीक्षेची तयारी सुरू आहे. ‘युपीएससी’ परीक्षेत यश मिळविण्याचे ध्येय असल्याचे लक्ष्मण याने सांगितले.