कोल्हापूर : भाजी मंडई, धान्य मार्केट, फळ बाजार यासह सुईपासून सायकलपर्यंत आणि मिरचीपासून मसाल्यापर्यंतची विक्री करणारी हजारो दुकाने एकाच ठिकाणी असल्यामुळे लक्ष्मीपुरीसारख्या मध्यवर्ती भागात सर्वाधिक वर्दळ होत आहे. तेथे येणारी हजारो वाहने, रस्त्यावरील अतिक्रमण यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी या गर्दीत चालायचे कसे? हाच एक गंभीर प्रश्न नव्याने तयार झाला आहे.
शहरातील गर्दीचे विकेंद्रीकरण करण्याऐवजी केंद्रीकरणच मोठ्याप्रमाणात होत असल्याने दिवसेंदिवस वर्दळीची समस्या गंभीर होत चालली आहे. सुदैवाने आतापर्यंत अपघात झाला नाही, कोणाला प्राणास मुकावे लागले नाही म्हणून त्याकडे कोणी फारसे गांभीर्याने पाहिलेले दिसत नसले, तरी ही बेफिकीर कधी, तरी अडचणीची ठरणार आहे.
लक्ष्मीपुरीतील धान्य बाजारात रोज शेकडो अवजड वाहने येतात, मालाची चढ-उतार करतात. कधी कधी हीच अवजड वाहने लावायला जागा मिळत नाही. त्यामुळे येथील वाहतूक नेहमी ठप्प झालेली असते. याच ठिकाणी असलेल्या बाजारपेठेत मोठी वर्दळ असते. तेथे येणाऱ्या नागरिकांची दुचाकी वाहने लावायला जागा मिळत नाही. फळांच्या गाड्यांनी तर चारही प्रमुख रस्ते व्यापून टाकले आहेत. त्याच ठिकाणी रिक्षा थांबे आहेत, त्यांची गर्दी असते. खरेदीसाठी शहराच्या विविध भागातून येणाऱ्या नागरिकांची दुचाकी, चारचाकी वाहने याच गर्दीत मिळतात.
सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत लक्ष्मीपुरी परिसर म्हणजे गर्दीचा महापूर असतो. त्यातून खरेदी केलेले साहित्य हातात घेऊन चालत जाणे, रस्ता पार करणे म्हणजे एकप्रकारचे दिव्यच! रोजचीच ही समस्या आहे. या गर्दीवर ना महापालिका प्रशासनाला उत्तर सापडले आहे, ना पोलिसांना! कोरोना संसर्गाच्या काळात पोलीस व महापालिका कर्मचाऱ्यांनी या गर्दीवर सक्तीने निर्बंध लादले खरे; पण आता कसलेच नियंत्रण राहिलेले नाही.
- रोज ५० हजार नागरिकांची ये-जा-
लक्ष्मीपुरी हा शहराच्या मध्यवर्ती भाग असल्यामुळे शहराच्या चारी बाजूंनी नागरिक येथे दैनंदिन तसेच मासिक, वार्षिक खरेदी करण्यास येत असतात. दिवसभरात रोज चाळीस ते पन्नास हजारांच्या आसपास नागरिकांची ये-जा सुरू असते. रविवारी तर आठवडा बाजार भरत असतो, त्यावेळी ही गर्दी दुप्पट होते.
- फूटपाथचे अस्तित्वच नाही-
लक्ष्मीपुरीतील रस्ते मोठे प्रशस्त असले, तरी एकाही रस्त्यावर फूटपाथ करण्यात आलेला नाही. गतवर्षी प्रथमच अनेक वर्षांनी या परिसरात भूमिगत गटारी, रस्त्यांची कामे केली; पण फटपाथ काही केले नाहीत. त्यामुळे नागरिकांना चालताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते.
- अतिक्रमण हटाव दाखवायलाच -
महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे पथक रोज लक्ष्मीपुरी बाजारात फेरी मारते. गाडी आली की फळविक्रेते गाड्या जाग्यावरून हटवितात, आतील रस्त्यावर जातात. गाडी गेली की पुन्हा रस्ता व्यापला जातो.
अधिकारी म्हणतात.....
कोरोना काळात भाजी मंडईतील गर्दी पन्नास टक्के कमी करण्यात आली आहे.आठवडा बाजार बंद करण्यात आला आहे. फळविक्रेत्यांना अंतर ठेवून जागा देण्यात आली आहे. त्यामुळे येथील गर्दी बऱ्यापैकी नियंत्रणात आणली आहे.
सचिन जाधव, इस्टेट अधिकारी
कोल्हापूर महानगरपालिका
लक्ष्मीपुरी बाजारपेठ शहरातील प्रमुख बाजारपेठ आहे. त्याठिकाणी होणाऱ्या गर्दीवर कोरोना संसर्गाच्या काळात चांगले नियंत्रण राखले गेले, परंतु हा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.
अशोक येरुडकर, पादचारी
लक्ष्मीपुरीत होणारी गर्दी मोठी आहे. या गर्दीतून चालत जाणे म्हणजे एक दिव्यच आहे. विक्रेत्यांची बैठक व्यवस्था, पार्किंगची सोय झाली तरच ही गर्दी सुसह्य होईल.
कृष्णात नलवडे, पादचारी
(फोटो देणार आहे.)