समीर देशपांडेकोल्हापूर : कोल्हापूरचे नूतन पालकमंत्री दीपक केसरकर यांना कोल्हापूरचा दसरा म्हैसूरच्या धर्तीवर साजरा करायचा आहे. दोन वर्षांत कोल्हापूरचा त्यांना जयपूरच्या धर्तीवर विकास करायचा आहे. मग यासाठी रस्त्यावर गोट्या खेळून आणि टायर फिरवून काहीच साध्य होणार नाही. या क्षेत्रात खरोखरच काही भरीव काम केलेल्यांची मते विचारात घेऊन तसा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.याआधीही तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि सतेज पाटील यांनी पर्यटनवाढीसाठी काही प्रयत्न केले. परंतु, यामध्ये तत्कालीक उपक्रमांची संख्या जास्त होती. यासारखे उपक्रम कोल्हापूरमध्ये अनेक संस्था करत असतात. त्याला महाराष्ट्र शासनाची गरज नाही. शासनाने पर्यटन वाढवताना त्याठिकाणी जाण्यासाठी उत्तम खड्डेविरहीत रस्ते, त्या-त्या ठिकाणी स्वच्छ असलेली स्वच्छतागृहे, कुठूनही जाण्या-येण्यासाठी फलकांच्या माध्यमातून मार्गदर्शन याकडे लक्ष देण्याची गरज आहे.कोल्हापुरात आल्यानंतर पार्किंग कुठे करायचे, या विवंचनेत असलेला भाविक, पर्यटक मेटाकुटीला येतो. मग अंबाबाई दर्शन. त्याठिकाणी प्रचंड गर्दी. घाेषणा झाल्या परंतु निधीच नसल्याने अंबाबाई मंदिर परिसराचा विकास रखडला. दर्शन झाल्यानंतर आणखी काय, कुठे पहायचे याची नेमकी माहिती देणारी यंत्रणा नाही. मग कोणाला तरी विचारून कुठे जायचे याचे नियोजन होते. त्यामुळे अजूनही पालकमंत्री केसरकर यांनी फुटकळ उपक्रमांपेक्षा पर्यटन वाढीसाठी आवश्यक असलेल्या मुलभूत सोयी आणि सुविधा पहिल्यांदा देण्यावर भर द्यावा, जेणेकरून पर्यटकांना दिलासा मिळेल.
लाईटही नाही आणि साऊंडही नाहीअनेक ठिकाणी त्या-त्या शहराचे वैशिष्ट्य सांगणारा एखादा अर्ध्या तासाचा कार्यक्रम संध्याकाळच्या वेळी शहरात सादर केला जातो. परंतु, कोल्हापुरात यातील काहीही होत नाही. भवानी मंडपमध्ये अशा पद्धतीचे सादरीकरण पर्यटकांना पर्वणी ठरेल. पण धोरण म्हणून काही गोष्टी नीट ठरविल्या गेल्या पाहिजेत.
सुशोभिकरण म्हणजे पर्यटन विकास नव्हे
चौकाची रंगरंगोटी, तिथे काही तरी वेगळे उभे करणे, तलावाभोवती पेव्हिंग ब्लॉक बसविणे, हायमास्ट दिवे लावून त्याखाली बाकडी टाकणे आणि मंदिरांच्या समोर सांस्कृतिक सभागृह उभारणे म्हणजे पर्यटन विकास अशी कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांची धारणा झाली आहे. देश-विदेशात फिरणाऱ्या या मंडळींना कणेरी मठावरील ग्रामजीवनाच्या संकल्पनेसारखी भव्य-दिव्य संकल्पना आपल्या जिल्ह्यात राबवावी, असे आतापर्यंत का वाटले नसावे, याचेच आश्चर्य वाटते.