कोल्हापूर : कमीत कमी गुंतवणूक करून, आकर्षक व्याज अथवा सोन्याच्या दागिन्यांचे आमिष दाखवून हुपरीतील प्रसिद्ध दोघा सराफांनी ७० लोकांना सुमारे सव्वा कोटींचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. संशयित सराफ विशाल भारती आणि अभिजित रामचंद्र गिरीबुवा (दोघे रा. हुपरी, ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत. आतापर्यंत २० लाखांपर्यंत फसवणूक झाल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
अधिक माहिती अशी, संशयित सराफ हे सोने-चांदी खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी १० फेब्रुवारी २०१६ रोजी दाभोळकर कॉर्नर येथे व्यंकटेश ज्वेलर्स नावाचे दुकान सुरू केले होते. त्यानंतर एका वृत्तपत्रात कमीत कमी गुंतवणूक दोन लाखांपासून तसेच व्यवसायाचे प्रशिक्षण सुरू करून महिना ३० हजार अधिक कमवू शकता. घरबसल्या व्यवसाय करू शकता.
महिलांसाठी ब्रॅँडच्या अंतर्गत व्यवसाय करण्याची संधी, उच्च दर्जाच्या दागिन्यांची हमी अशी जाहिरात दिली होती. ती फिर्यादी अच्युत श्रीकृष्ण राशिवडेकर (वय ७४, रा. रंकाळा स्टॅँड परिसर, कोल्हापूर) यांनी वाचली. त्यांनी संशयित विशाल भारती यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. भारती याने माहिती दिल्यानंतर त्यांनी दोन लाख रुपये भरण्यास नकार दिला.
त्यावर भारती याने एक वर्षाकरिता एक लाख रुपये भरल्यास दर महिन्याला दोन टक्के दराने दोन हजार रुपये देतो व वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही गुंतविलेली रक्कम परत देतो, असे सांगून चार महिन्यांचा इस्टॉलमेंटचा नफा म्हणून आठ हजार रुपयांचा धनादेश त्यांना दिला. तो राशिवडेकर यांनी बँकेत भरल्यानंतर वटला नाही.त्यामुळे भारती याने त्यांना रोख रक्कम देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर राशिवडेकर व अन्य गुंतवणूकदारांना धनादेश देऊन त्यांच्याकडून रक्कम गुंतवणूक करून घेतली. काही महिने त्यांना परतावा करून विश्वास संपादन केला.
पैसे मिळत असल्याने अनेकांनी त्यांच्याकडे पैसे गुंतविले. मोठ्या प्रमाणात रक्कम गोळा झाल्यानंतर त्यांनी परतावा देण्यास टाळाटाळ केली. गुंतवणूकदारांनी पैशांची मागणी केली असता भामटे उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. सुमारे सव्वा कोटी रुपयांचा गंडा घातल्याची खात्री झाल्यानंतर या दोघा भामट्यांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक संजय मोरे याचा तपास करीत आहेत.
हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाची भुरळदाभोळकर कॉर्नर येथील सराफी दुकानात महिलांसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेऊन त्यांना सोन्याच्या दागिन्यांचे आमिष दाखवून रक्कम भरून घेतली. योजना चांगली असेल या आशेपोटी जिल्ह्णातील शासकीय नोकरदार, व्यापारी, गृहिणी अशा अनेक महिलांनी त्यांच्या ज्वेलर्समध्ये पैसे गुंतविले आहेत.जादा परताव्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या हुपरीच्या दोघा सराफांवर गुन्हा दाखल झाला आहे. फसवणुकीची व्याप्ती मोठी असून दाखल गुन्ह्यांच्या रकमेमध्ये वाढ होणार आहे. ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा.- संजय मोरे,पोलीस निरीक्षक