देवगड-निपाणी हा आंतरराज्य मार्ग यात समाविष्ट होता, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने सिंधुदुर्ग हद्दीतील काम नंतर वगळण्यात आले. पुण्यातील जितेंद्रसिह कंपनीने हा ठेका घेतला आहे. २०१८ पासून काम सुरू आहे. मात्र सुरुवातीपासूनच काम धिम्या गतीने सुरू आहे. निपाणी ते सुरूपली, सोळांकुर ते राधानगरी हद्द व फेजिवडे ते दाजीपूर या भागात काही प्रमाणात काम झाले आहे. मात्र यातील मोठे पूल,मोऱ्या, पक्की गटारे, अंतिम डांबरीकरण,बाजुपट्ट्या व अन्य आनुषंगिक कामे अपुरी आहेत. झालेले कामही निकृष्ट असून आवश्यक दर्जानुसार नाही. त्यामुळे सर्वच थरातून याबाबत तक्रारी आहेत.
सुरूपली ते मुदाळ तिट्टा, नरतवडे ते सोळांकुर व राधानगरी ते फेजिवडे या भागात रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पावसामुळे मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. वाहतूक करणे जीवघेणे ठरत आहे. त्यामुळे जनतेमधून असंतोष आहे.
ठेका बदलण्याची कार्यवाही सुरू आहे. मात्र यामध्ये अनेक अडचणी आहेत. २०१८ च्या दराने काम मंजूर झाले आहे. ठेका बदलायचे झाल्यास झालेल्या कामाचे मूल्यांकन करून नवीन आराखडा व अंदाजपत्रक करावे लागेल यात सध्याच्या दराने रक्कम वाढणार आहे. त्यासाठी पुन्हा मंजुरीचे सोपस्कार पूर्ण करावे लागणार आहेत. ही प्रक्रिया वेळखाऊ ठरणार आहे.
२२५ कोटीच्या कामात ६० टक्के नुसार शासन हिस्स्याचे १३५ कोटी होतात. त्यातील ६५ कोटी रुपये ठेकेदारला अदा झालेले आहेत. त्याने गुंतवायची ४० टक्के रक्कम उभी करण्यास न आल्याने कामावर पुरेशी यंत्रणा निर्माण करता आली नाही. परिणामी काम रेंगाळत गेल्याचे स्पष्ट होत आहे.
फोटो ओळ - निप्पाणी-दाजीपूर रस्त्याचे काम रेंगाळल्यामुळे अनेक ठिकाणी मोठी दुरवस्था झाली आहे. राधानगरी ते फेजिवडे दरम्यान असे मोठे खड्डे पडले आहेत. फोटो- संजय पारक