कोल्हापूर : यशस्वी उद्योजकतेसाठी मानवी शक्ती ही फार मोलाची भूमिका बजावते. आजच्या धावपळीच्या युगात यांत्रिकीकरणाला मानवी बळाची जोड मिळत असेल तर कोणताही उद्योगधंदा यशस्वी होतो, असे प्रतिपादन थायलंड (बँकाक) येथील डॉ. थॉसापॉर्न मोहम्मद यांनी केले.अर्जुननगर येथील देवचंद महाविद्यालयात दुसऱ्या आंतरराष्टÑीय संशोधन परिषदेत डॉ. थॉसापॉर्न प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह होते. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आॅफ स्मॉल अँड मीडियम इंटरप्रायझेस सिंगापूर या विषयावर डॉ. थॉसापॉर्न म्हणाले, लहान मुलांमध्ये काम करण्याची वृत्ती व जिद्द सुरुवातीपासून निर्माण केली पाहिजे, तरच त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल. कमी वयातील जबाबदाºया माणसाला मोठे बनवितात. मानवी शक्तीचे योग्य नियोजन म्हणजे यश होय. यावेळी इंडो ग्लोबल चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चरल यांच्यातर्फे जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह यांना शिक्षण क्षेत्रातील ‘व्हिजनरी लीडर अवॉर्ड’ डॉ. थॉसापॉर्न यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या संशोधन परिषदेमधील ३०० हून अधिक संशोधन लेखांचे प्रकाशन ‘अजंठा’ या युजीसी मान्यताप्राप्त संशोधन पत्रिकेत करण्यात आले. या संशोधन पत्रिकेचा प्रकाशन समारंभही यावेळी झाला. या परिषदेसाठी ४०० पेक्षा अधिक प्राध्यापकांनी नावनोंदणी केली होती. या परिषदेसाठी २० विदेशी विद्यार्थी संशोधक, प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ. तृप्तीभाभी शाह, संस्थेचे खजिनदार सुबोधभाई शाह, प्राचार्य डॉ. पी. एम. हेरेकर, उपप्राचार्य डॉ. पी. पी. शाह, कार्यक्रमाचे सचिव डॉ. चंद्रवदन नाईक, निमंत्रक डॉ. ए. बी. नाडगौडा, प्रा. एम. एम. बागवान, डॉ. अशोक डोनर, डॉ. प्रताप पाटील यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. डॉ. जे. डी. इंगळे यांनी सूत्रसंचालन केले.
यशस्वी उद्योजकतेसाठी मानवी शक्ती मोलाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 1:03 AM