कोल्हापूर : शेळकेवाडी (ता. करवीर) येथे दोन दिवसांपूर्वी शेतात सापडलेल्या हाडांच्या अवशेषापाठोपाठ आता सोमवारी मानवी कवठी व दातांची कवळी पोलिसांना शोधकार्यात मिळाली. त्यामुळे वाशीतील दीड महिन्यापासून बेपत्ता असलेल्या महिलेबाबत गूढ वाढले आहे. संबंधित सापडलेली हाडे, कवठी हे सायंकाळी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहे, त्याचा अहवाल आल्यानंतर रहस्य बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस वाशी व शेळकेवाडी ग्रामस्थांकडे याबाबत चौकशी करत आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाशी गावातील ४२ वर्षीय महिला गेल्या दीड महिन्यापासून बेपत्ता आहे. त्या महिलेचा अद्याप शोध लागला नसताना शनिवारी (दि. ३० एप्रिल) वाशीनजीकच्या शेळकेवाडी येथील बारबाई खडक परिसरातील शेतात हाडं, बांगड्या, साडी, खुरपे, प्लास्टिकचा टप असे साहित्य पोलिसांना मिळाले. बेपत्ता महिलेच्या घरापासून त्यांची शेती किमान तीन किमी अंतरावर आहे. तर त्या शेतापासून दीड किमी अंतरावर हे हाडांचे अवशेष तसेच साहित्य मिळाले. त्यामुळे पोलीसही चक्रावले आहेत.दरम्यान, सोमवारी सकाळी पोलिसांनी पुन्हा घटनास्थळी जाऊन तपासणी केली. काही गावकऱ्यांशी चर्चा केली तर प्रारंभी हाडे मिळालेल्या ठिकाणापासून दुसऱ्या शेतात मानवी कवठी व कवळी पोलिसांना मिळाली. ही हाडे व कवठी पोलिसांनी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवली आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच रहस्याचा उलगडा होणार आहे. या प्रकरणाचा तपास करवीर पोलीस ठाण्याचे सहा. फौजदार गीता पाटील व हे. कॉ. विजय गुरव करत आहेत.