कोल्हापूर : लॉकडाऊन असतानाही मुक्या जनावरांवर न थकता थेट गोठ्यात जाऊन उपचार सुरू करण्याचे दिव्य पशुवैद्यकांकडून पार पाडले जात आहे. अपुरे मनुष्यबळ असतानाही योग्य ती खबरदारी घेऊन उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात या लॉकडाऊनच्या काळात तब्बल ८० हजार पाळीव जनावरांवर यशस्वी उपचार केले आहेत. यात १४०७ लहानमोठ्या जोखमीच्या शस्त्रक्रिया आहेत.
कोरोनाच्या धास्तीने सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे मानवी जग विस्कळीत झाले आहे. त्याचा काही अंशी फटका पाळीव जनावरांनाही बसत आहे. रस्ते बंद, औषधांची वेळेत उपलब्धता होईल याची खात्री नाही, गंभीर परिस्थिती उद्भवल्यास वाहनाची सोयदेखील करता येत नाही, अशी परिस्थिती चोहोबाजूंना आहे. अशा परिस्थितीत मुक्या जनावरांची उपचाराविना तडफड होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग राबत आहे. पशुवैद्यकीय केंद्रावर जनावर आणता येत नसेल तर थेट गोठ्यात जाऊनच उपचार केले जात आहे.गेल्या महिनाभरात जिल्ह्यात ८० हजार ५०० जनावरांवर यशस्वी उपचार झाले आहेत. यात औषधोपचार झालेले ५२ हजार ७१५, कृत्रिम रेतनाचे ९ हजार १३९, गर्भतपासणी केलेले ११ हजार ३३६, वांझ तपासणी पाच हजार ८८३, शस्त्रक्रिया १४०७ यात मोठ्या ११९, लहान १२८८ अशा पशुधनावर उपचार झाले आहेत.
मुळात जिल्हा परिषदेकडे अपुरी यंत्रणा आहे. केवळ २८ डॉक्टर, ६७ पशुधन पर्यवेक्षक, १६ साहाय्यक पशुविकास अधिकारी यांच्या जिवावर जिल्ह्यातील १८ लाख पशुधनावर ती उपचाराचे काम करीत आहे. एकेका डॉक्टराकडे तीन ते चार गावांची जबाबदारी देऊन त्यांच्याकडून उपचार करवून घेतले जात आहेत.
आता उन्हाळा असल्यामुळे दुभती, पाळीव जनावरे आजारी पडण्याचे प्रमाणही जास्त असते. त्यांच्या आहार आणि विहाराबरोबरच वेळच्या वेळी तपासण्यांकडे काटेकोर लक्ष द्यावे लागते. लॉकडाऊनमुळे यावर मर्यादा आल्या असल्या तरी यातूनही मार्ग काढण्यात आला आहे. पशुसंवर्धन विभागाच्या सरकारी प्रयत्नांना खासगी दूध संघाचेही सहकार्य लाभत असल्याने या सेवा देणे अधिक सुलभ झाले आहे..
रस्ते बंद असतानाही अत्यावश्यक सेवेचे पास देऊन, हॅँडग्लोव्हज, मास्क, सॅनिटायझरसारखे सुरक्षा किट पुरवून पशुधन वाचविण्यासाठी धडपडणाऱ्यांची खबरदारी पशुसंवर्धन विभागाकडून घेतली जात आहे.- डॉ. विनोद पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी