कोल्हापूर : कोरोनामुळे जगभरातील नागरिकांना अनेक गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत असले तरी यानिमित्ताने कोल्हापुरातील श्री अंबाबाईच्या गाभाऱ्यातील आर्द्रता एकदम २५ टक्क्यांनी कमी झाली आहे. अंबाबाई मूर्तीची झीज होण्यामागे आर्द्रतेचे वाढते प्रमाण हे महत्त्वाचे कारण असून, गेले महिनाभर भाविकच नसल्याने आर्द्रतेत घट झाली आहे तर तापमानदेखील ०. ८ डिग्री सेल्सिअसने कमी झाले आहे.
महाराष्ट्रातील साडेतील शक्तीपीठातील प्रमुख देवता असलेल्या श्री अंबाबाईची सध्याची मूर्ती किमान १५०० वर्षांपूर्वीची आहे. पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्वत:हून याबाबतची माहिती दिली आहे. मूर्तीची मोठ्या प्रमाणात झीज झाल्याने पूर्वी १९५५ मध्ये मूर्तीवर वज्रलेप करण्यात आला होता. मात्र, सुमार दर्जाच्या वज्रलेपामुळे मूर्तीची आणखीनच झीज झाली. त्यावर उपाय म्हणून वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या मदतीने वर्षानुवर्षे सुरू असलेला वज्रलेपाचा वाद सामंजस्याने मिटला आणि आॅगस्ट २०१५मध्ये अंबाबाईच्या मूर्तीचे रासायनिक संवर्धन करण्यात आले. त्यानंतर मूर्ती पूर्वपदावर आली असली तरी संवर्धन करणाºया अधिकाºयांनी परत जाताना श्रीपूजक व देवस्थान समितीला काही नियमावली घालून दिली होती.
तज्ज्ञांच्या मतानुसार मूर्तीची झीज होण्यामागे गाभाºयातील व परिसरातील आर्द्रता हे महत्त्वाचे कारण होते. ही आर्द्रता कमी करण्यासाठीच्या काही उपाययोजना त्यांनी सुचविल्या होत्या. त्यात गाभा-यातील व मंदिरातील गर्दी कमी करणे, पाणी, फुलं, फळांचा कमीत कमी वापर, हवा खेळती राहण्यासाठी खिडक्यांसह झरोखे खुले करणे, अशा उपायांचा समावेश होता. मात्र, रोज येणाºया भाविकांची संख्या हजारात, तर नवरात्रौत्सव व सणावाराच्या काळात लाखोंमध्ये असते. त्यामुळे या काळात कितीही उपाययोजना केल्या तरी आर्द्रता वाढतेच.
कोरोनामुळे गेले महिनाभर मंदिर बंद आहे. देवीचे रोजचे धार्मिक विधी पार पाडणारे श्रीपूजक, देवस्थान समितीचे मोजके कर्मचारी व सुरक्षा रक्षकवगळता मंदिरात शुकशुकाट आहे. त्यामुळे गाभाºयातील आर्द्रता ५५ टक्क्यांवर आली आहे. हीच आर्द्रता गर्दीच्या वेळी ८० टक्क्यांपर्यंत असते तर तापमान ३३ ते ३४ डिग्री सेल्सिअस इतकी असे, तीदेखील ०.८ टक्क्यांनी कमी झाली आहे. ही आर्द्रता कमी झाल्याने त्याचा सकारात्मक परिणाम देवीच्या मूर्तीवर होणार आहे.
आर्द्रता अशीगर्दीच्या वेळी सध्याच्या काळातगाभारा ७० ते ८० टक्के ५० ते ५५ टक्केपितळी उंबरा ८० ते ८५ टक्के ४० ते ४५ टक्केकासव चौक २८ ते ३२ टक्के २८ ते ३२ टक्के
भाविकांचा श्वासोच्छवास, पाणी, हार, फुलं, फळं या कारणांमुळे गाभाऱ्यातील आर्द्रता वाढते. त्यावर समितीकडून उपाययोजना सुरू आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे मंदिर पूर्ण बंद असल्याने आर्द्रतेत कमालीची घट झाली आहे.- महेश जाधव, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती