कोल्हापूर : शहरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा, खड्डेमय रस्ते अन् महानगरपालिका प्रशासनाचा रस्त्यांबाबतचा भोंगळ कारभार याचे वाभाडे काढणारे सचित्र दर्शन सिराज मुजावर यांनी व्यंगचित्रांमधून कोल्हापूरवासीयांसमोर ठेवले. ‘खड्ड्यांतूनच खाली मोहेंजोदडो-हडप्पासारखे शहर सापडतेय का पाहतोय, डॅडी चला खड्डे मोजायला’ असे शहरातील खड्ड्यांचे विडंबनात्मक दर्शन यातून दाखविण्यात आले. नेशन फर्स्ट व भाजपचे सरचिटणीस विजय तायशेटे यांच्यावतीने या अभिनव पद्धतीने आंदोलनाला सुरुवात केली आहे.शहरातील रस्त्यांत पडलेल्या खड्ड्यांबाबत नागरिकांतून संतापाची लाट उमटत आहे. बहुतांशी रस्तेच गायब झाले असून, खड्ड्यांतूनच प्रवास करताना कोल्हापूरकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महानगरपालिका प्रशासन मात्र यावर मलमपट्टी करून वेळ मारून नेत आहे. त्यामुळे या शहरातील रस्त्यांबाबत नागरिकांतून उठाव होण्यासाठी तसेच जनजागृती होण्याच्या उद्देशाने ‘नेशन फर्स्ट’च्यावतीने हे अभिनव आंदोलनात्मक पाऊल उचलले आहे.व्यंगचित्रकार सिराज मुजावर यांनी रस्त्यांच्या चौका-चौकांत बसून रस्त्यांची विडंबनात्मक व्यंगचित्रे रेखाटत ती नागरिकांसमोर ठेवली आहेत. शुक्रवारी हे अभिनव आंदोलन गंगावेश येथे झाले. शनिवारी भवानी मंडप कमानीशेजारी करण्यात आले. आज, रविवारी रंकाळा चौपाटी, उद्या, सोमवारी राजारामपुरी जनता बझारनजीक, तर मंगळवारी (दि. १९) शिवाजी पेठेतील न्यू कॉलेजजवळ हे व्यंगचित्र प्रदर्शन होणार आहे. या आंदोलनात स्वत: सिराज मुजावर, विजय तायशेटे, अनिरुद्ध कोल्हापुरे, विवेक कुलकर्णी, निखिल मोरे, ओंकार खराडे, आदींचा समावेश आहे.खड्ड्यांत शोधताहेत मोहेंजोदडो-हडप्पा शहरखड्ड्यांतूनच खाली मोहेंजोदडो-हडप्पासारखे शहर सापडतेय का पाहतोय, डॅडी चला खड्डे मोजायला, कारसह ते खड्ड्यात पडलेत, त्यांची मीटिंग रद्द करा अगर दुसरी गाडी पाठवा, आदी विडंबनात्मक दर्शन त्यांनी व्यंगचित्रांतून रेखाटले आहे.