कोल्हापूर : मानवी जीवनास अपायकारक असलेल्या व त्याचा पुन्हा वापर होऊ नये यासाठी गुटखा, पानमसाला, मावा, सुगंधी तंबाखू, अशा सुमारे दीड कोटी रुपयाच्या मालाची गुरुवारी कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहत परिसरात विल्हेवाट लावली. गेल्या वर्षभरात कोल्हापूरच्या अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करून एक कोटी ४३ लाख ५० हजार २०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या कारवाईमध्ये एकूण ६७ खटले नोंद झाले असून, त्यामध्ये ९० च्यावर संशयित आरोपी आहेत. अन्न व औषध प्रशासनाने सांगितले की, कोल्हापूर जिल्ह्यात अवैध मार्गाने गुटखा, पानमसाला, मावा, सुगंधी तंबाखूची विक्री व त्यांची साठवणूक करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने गेल्या वर्षभरात कारवाईचे हत्यार उपसले होते. १ सप्टेंबर २०१४ ते ३० सप्टेंबर २०१५ या कालावधीत जिल्ह्यात एकूण ६७ कारवाया झाल्या. त्यात शहरातील ३५ व ग्रामीण भागातील ३२ कारवायांचा समावेश होता. इचलकरंजी येथील राजू पाछापुरे याच्याकडून मावा, तर कोंडिग्रे येथे सहा लाख ५२ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला होता. या सर्व कारवायांमधून जप्त केलेला माल रविवार पेठेतील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयातील गोडावूनमध्ये ठेवण्यात आला होता. वर्षभरात जप्त केलेला सुमारे १७ ते १८ टन माल गुरुवारी तीन ट्रकमधून विल्हेवाट लावण्यासाठी कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये नेण्यात आला. या ठिकाणी असलेल्या महालक्ष्मी पशुखाद्य या कारखान्यातील बॉयलरमध्ये हा माल टाकून नष्ट करण्यात आला. यासाठी महसूल, पोलीस व ग्राहक संरक्षण खाते यांची मदत घेण्यात आली. जिल्ह्यातील विविध पानटपऱ्यांपासून ते उत्पादकांपर्यंत अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचे हत्यार उपसले होते. या कारवाईत सहायक आयुक्त (अन्न) संपत देशमुख, सुकुमार चौगुले, अन्नसुरक्षा अधिकारी एस. एस. सावंत यांचा सहभाग होता. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)मानवी जीवनास अपायकारक असलेल्या अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही जोमाने सुरू राहतील. त्यामुळे कोणीही गुटखा, माव्याची विक्री करू नये.- संपत देशमुख, सहायक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन विभाग, कोल्हापूर.
दीड कोटीच्या गुटखा, माव्याची विल्हेवाट
By admin | Published: October 09, 2015 12:54 AM