सावरवाडी : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सावरवाडी (ता. करवीर) येथील तुळशी नदीच्या तीरावरील महादेव सातेरी मंदिराजवळील शंभर वर्षांपूर्वीचा वृक्ष कोसळला. संततधार पावसामुळे तुळशी नदीपात्रातील पाणी पात्राबाहेर पडले आहे. तुळशी नदीपात्राशेजारी असलेल्या महादेव, सातेरी, मंदिराजवळ वडाचा मोठा वृक्ष होता. या वृक्षाखाली दसऱ्याला पालखी सोहळ्याचे धार्मिक कार्यक्रम होतात. शिवाय महाशिवरात्र उत्सवानिमित्य हरिनाम सप्ताह सोहळा, महाप्रसाद वाटप असे कार्यक्रम पिढ्यान् पिढ्या साजरे होत असत.
तुळशी नदीतीरावरील शंभर वर्षांपूर्वीचा वडाचा मोठा वृक्ष संततधार पाऊस जोरदार वाऱ्याबरोबर घाटाच्या मुख्य रस्त्यावर उन्मळून पडला. यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती गावात समजताच ग्रामस्थांनी नदीकाठी गर्दी केली होती. शंभर वर्षांपूर्वीची साक्ष देणारा हा वृक्ष होता अशी माहिती जुन्या पिढीतील जाणकारांनी दिली.
फोटो ओळ - सावरवाडी (ता. करवीर) येथील जोरदार पावसामुळे तुळशी नदीतीरी महादेव सातेरी मंदिरानजीक असलेला शंभर वर्षांची साक्ष देणारा वृक्ष उन्मळून पडला.
१८ सावरवाडी ट्री