कर्नाटक शासनाने सोमवार, दि. १० मे पासून कडक लॉकडाऊनची घोषणा केली होती. याची अंमलबजावणी निपाणी शहरात सुरू झाली आहे. सोमवारी दिवसभरात निपाणी मंडळ पोलीस स्थानकाच्याअंतर्गत येणाऱ्या खडकलाट, बसवेश्वर, शहर व ग्रामीण पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी शंभरावर दुचाकींवर कारवाई करत त्या जप्त केल्या आहेत. विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीधारकांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
कर्नाटक शासनाने वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पुन्हा १४ दिवसांचे कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. कोगनोळी नाक्यावरही पोलीस बंदोबस्त वाढवला असून, बाहेरून येणाऱ्या दुचाकींना प्रवेश बंद केला आहे. निपाणी शहरातही छत्रपती संभाजी राजे चौकात पोलीस बंदोबस्त असून, येथे प्रत्येक गाडीची तपासणी सुरू आहे.
निपाणीचे सीईआय आय. एस. गुरुनाथ, शहर स्थानकाचे फौजदार अनिल कुंभार, ग्रामीण पोलीस स्थानकाचे फौजदार बी. एस. तलवार, बसवेश्वर स्थानकाच्या फौजदार अनिता राठोड यांच्या नेतृत्वात चोख बंदोबस्त असून, विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दुचाकी जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. खडकलात पोलीस स्थानकाने २५, बसवेश्वर पोलीस स्थानकाने २५, शहर पोलीस स्थानकाच्या ४०, तर ग्रामीण पोलीस स्थानकाने ५ दुचाकींवर कारवाई करत त्या जप्त केल्या आहेत.
सर्व शासकीय कार्यालयांचे सॅनिटायझेशन
निपाणी अग्निशामक दलाच्यावतीने सोमवारी निपाणी शहरातील तहसील कार्यालय, तालुका पंचायत कार्यालय, नगरपालिका कार्यालय, कर्नाटक बँक, स्टेट बँक यासह सर्व शासकीय कार्यालयांचे सॅनिटायझेशन करण्यात आले.
जप्त केलेल्या गाड्या.....
शहर पोलीस स्थानक ४०
बसवेश्वर पोलीस स्थानक २५
ग्रामीण पोलीस स्थानक ५
खडकलात २५
फोटो : निपाणी शहर पोलीस स्थानकाने दुचाकींवर कारवाई करत त्या जप्त केल्या आहेत.