कोल्हापूर : तब्बल सहा वर्षांनंतर कोल्हापूर-मुंबई विमानसेवा २४ डिसेंबरला सुरू होणार आहे. या पहिल्या विमानाने जाण्यासाठी शंभरजण उत्सुक आहेत. त्यांनी याबाबतची प्राथमिक स्वरुपातील नोंदणी विविध प्रवासी वाहतूक सेवा पुरविणाऱ्या संस्थांकडे केली आहे. विमानसेवा प्रारंभाबाबत कोल्हापूरकरांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.धावपट्टीची दुरुस्ती, नागरी वाहतुकीचा परवाना, आदी कारणांमुळे गेल्या सहा वर्षांपासून कोल्हापूरची विमानसेवा बंद आहे. खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज आदी संघटनांच्या पाठपुराव्यातून अखेर २४ डिसेंबर हा विमानसेवा प्रारंभाचा मुहूर्त सरकारने निश्चित केला आहे.
‘उडान’ योजनेअंतर्गत एअर डेक्कन कंपनी कोल्हापूर-मुंबई अशी विमानसेवा पुरविणार आहे. यासाठी ‘एअर डेक्कन’चे १८ आसनी विमान असणार आहे. ‘उडान’अंतर्गत यातील पहिल्या दहा जागांचा तिकीट दर अडीच हजार ते तीन हजार रुपये असणार आहे. उर्वरीत आठ जागांसाठी सहा ते सात हजार रुपये दर असेल.
पहिल्या दिवशी कोल्हापूर-मुंबई हवाई सफर करण्याची इच्छा असणाऱ्या शंभर जणांनी प्रवासी वाहतूक सेवा पुरविणाऱ्या संस्थांकडे नोंदणी केली आहे. यातील अधिकतर जणांनी पहिल्या जागांमधील तिकिटासाठी आग्रह धरला आहे. दरम्यान, कोल्हापूर-मुंबई विमानसेवा नियमितपणे सुरू होण्यापूर्वी विमानोड्डाण चाचणी बुधवारी (दि.२०) कोल्हापूर विमानतळ येथे होणार आहे. या चाचणीनंतर विमानसेवा सुरू करण्याबाबतची पुढील पाऊल पडणार आहेत. त्यामुळे संबंधित चाचणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
नोंदणीची प्रक्रिया आॅनलाईनकोल्हापूर-मुंबई विमानसेवेसाठी तिकीट नोंदणीची प्रक्रिया आॅनलाईन असणार आहे. त्यासाठी एअर डेक्कन कंपनीचे संकेतस्थळ अथवा तिकीट नोंदणीची सेवा देणाऱ्या काही मोबाईल अॅप्सचा प्रवाशांना वापर करावा लागणार आहे. अधिकृतरित्या तिकिटासाठीची नोंदणीची प्रक्रिया २१ डिसेंबरपासून सुरू होईल.
कोल्हापूरची विमानसेवा सुरू करण्याचा सरकारचा निर्णय चांगला आहे. येथील उद्योजक, व्यापारी आणि कोल्हापूरकरांना विनंती आहे की, त्यांनी या विमानसेवेचा लाभ घ्यावा. नियमितपणे येथे सेवा सुरू राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा.- बी. व्ही. वराडे,विभागीय व्यवस्थापक, ट्रेड विंग्ज् लिमिटेड